Breaking News

सत्तास्थापनेसाठी शिवसेना आमदारांची आज बैठक

मुंबई
राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या मातोश्री निवासस्थानी ही बैठक होणार आहे.
या बैठकीत राज्यामध्ये सध्या निर्माण झालेला सत्तावाटपाचा तिढा, भाजपासोबत वाटाघाटी करण्याबाबत आमदारांची भूमिका, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यास त्याचे स्थानिक राजकारणावर होऊ शकणारे संभाव्य परिणाम, भाजपाबाबत शिवसेना आमदारांचे असलेले मत याबाबत चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत निर्माण झालेला पेच अद्यापही कायम आहे. शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम ठेवला आहे, तर काँग्रेसमधील एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल आहे. दुसरीकडे भाजपाने आता काहीशी नरमाईची भूमिका घेतली असली तरी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद न देण्यावर ते ठाम आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे.  दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून, शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाबाबत घेतलेली ठाम भूमिका आणि भाजपाने त्यास दिलेला नकार यामुळे बहुमत मिळूनही युतीचे घोडे अडले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडूनही विरोधात बसायचे की शिवसेनेला पाठिंबा द्यायचा याबाबत परस्परविरोधी विधाने करण्यात येत असल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे.  दरम्यान, बुधवारी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा अशी शेतकर्‍यांची इच्छा असल्याचे बोलून दाखवले आहे. यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत भाजपचे सरकार अन् मुख्यमंत्री होऊ देणार नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू देणार आहे. शरद पवार आणि सोनिया गांधींनी मिळून यावर तोडगा काढावा. भाजपापेक्षा शिवसेना केव्हाही चांगलीच आहे. देवेंद्र फडणवीस यांना भागवतांचा सल्ला घ्यावा लागतो. भाजपाचं हिंदुत्व आणि शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये बराच फरक आहे. आम्ही ईडीला घाबरत नाही, असे म्हणत त्यांनी भाजपवरही हल्लाबोल केला आहे.