Breaking News

आ.बाळासाहेब थोरात : महाराष्ट्र काँग्रेसचा 'बाहुबली' नेता

Balasaheb Thorat
संगमनेर/प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर जवळपास एक महिन्यांपेक्षा अधिक कालवधीनंतर काल राज्यात महाविकास आघाडीच्या नावाखाली आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि सहा मंत्रिपदाच्या शपथविधीचा भव्य सोहळा पार पडला. अतिवृष्टीने होरपळलेल्या महाराष्ट्रातील शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य जनतेला यानिमित्ताने मदतीची आशा निर्माण झाली  आहे. यासर्व आनंदाच्या क्षणांत संगमनेर तालुक्यातील जनतेचा आनंद यापेक्षाही अधिक होता. याचे कारण म्हणजे तालुक्यातील जनतेने विधानसभेत सलग आठव्यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून दिलेल्या आपल्या नेत्याला सहाव्यांदा मंत्रीपदी बसताना बघणे.

  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात ज्यांच्या नावाने आज संपूर्ण महाराष्ट्रात संगमनेर तालुका ओळखला जातो, अशा कर्तृत्ववान, निष्ठावान, कार्यकुशल नेतृत्वाला लाभलेले मंत्रिपद म्हणजे संगमनेरच्या जनतेने वेळोवेळी त्यांनी केलेल्या कामाची एकप्रकारे पावतीच म्हणावी लागेल. तशी पावती त्यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याआधी बऱ्याचदा दिली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रात दाणादाण उडाली. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यासारख्या माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव पक्षाला बघावा लागला होता. महाराष्ट्रातील पक्षाचे इतर कुठलेही ज्येष्ठ नेतृत्व पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी पुढे सरसावले नाही. अशा वेळी विधासभा निवडणूका अगदी तोंडावर असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आ.बाळासाहेब थोरात यांच्यावर  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जबाबदारी टाकली. यावेळी शांत आणि मृदू स्वभावाचे समजले जाणारे आ. थोरात यांना अडगळीत पडलेल्या पक्षाला उभारी मिळवून देऊन पुन्हा उभं करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. माध्यमातूनही त्यावेळी त्यांच्या नेतृत्वक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. जवळपास अर्धा डझनभर माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रीपदे भूषविलेल्या नेत्यांचा समावेश असलेल्या आणि मुळातच पराभूत मानसिकतेत असलेल्या महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षातील नेत्यांना घेऊन पुढे जाणे अगदी कठीण होते. परंतु चिखलात रुतलेल्या पक्षाच्या रथाला 'बाहुबली' चित्रपटातील नायकाप्रमाणे रस्त्यावर आणण्याचे काम प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

 देशातील केंद्रीय नेतृत्वाची प्रचारात साथ नसताना देखील नियोजनबद्ध पद्धतीने तिकिटांचे वाटप, प्रचारयंत्रणेचा सुयोग्य वापर आणि कुठलाही आक्राळपणा न दाखवता जिल्हानिहाय उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोट बांधून शक्य तेवढ्या जागा जिंकून देण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांत 'अंडरडॉग' समजला गेलेला काँग्रेस पक्षाने ४४ जागेंपर्यंत  यावेळी आपली मजल मारली. विधासभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह एक एक करून नेते पक्ष सोडत असताना आ. बाळासाहेब थोरात यांनी खंबीरपणे पक्षाचे नैतृत्व सांभाळले. त्याच कामांचे बक्षीस म्हणून आ.थोरातांना मिळालेले हे मंत्रीपद म्हणावे लागेल. संगमनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी यापुढे ते काम करतील यात काही शंका नाही.

  परंतु महाविकास आघाडीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षीय विचारधारेचे ध्रुवीकरण झाले असतांना एक प्रश्न नक्की मनात येतो, तो म्हणजे आ. बाळासाहेब थोरात यांनी भविष्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बनलेल्या एखाद्या मंत्रिमंडळात आपल्याला संधी मिळेल याची त्यांनी किंवा काँग्रेस पक्ष नेतृत्वाने कधी स्वप्नातही कल्पना केली नसावी. परंतु आ. बाळासाहेब थोरात यांच्या या आशा निस्वार्थी आणि धोरणी व नियोजनबद्ध कामाचीच ही पावती आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.