Breaking News

दान केल्याने संपत्तीस येतो सुगंध :भास्करगिरी महाराज

श्री कालभैरवनाथांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहाची सांगता   


नेवासे/प्रतिनिधी

 श्री कालभैरवनाथ हे भगवान शिव शंकराचा अवतार असून त्यांचा अवतार भक्तांच्या उद्धारासाठी झाला. क्षेत्र बहिरवाडी हया जागृत क्षेत्राचा महिमा अगाध आहे. आपली पंचक्रोशी ही विविध तिर्थक्षेत्राने नटलेली असून या क्षेत्राच्या उद्धारासाठी सर्वांनी योगदान देण्यासाठी पुढे यावे. केलेल्या दानाने संपत्तीला खरा सुगंध येत असल्याने जीवनात आडलेल्या नारायणाची सेवा करा, गोधनाची व भूमी धनाची जोपासना करा असे आवाहन भास्करगिरी महाराजांनी केले.

 नेवासे तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथे श्री कालभैरवनाथांच्या जन्मोत्सव सोहळयाच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची भास्करगिरी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

 यावेळी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये योगदान देणाऱ्या भाविकांचा भास्करगिरी महाराजांच्या हस्ते श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी काल्याची दहीहंडी फोडून उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी रामनाथ महाराज पवार, विजय महाराज पवार, लक्ष्मण महाराज नांगरे, बाळू महाराज कानडे, नामदेव महाराज कंधारकर, भाऊसाहेब महाराज मोरे, नळघे बाबा, मच्छिंद्र महाराज पठाडे, बदाम महाराज पठाडे यांच्यासह सोहळयात योगदान देणारे श्री कालभैरवनाथ मंदिर विश्वस्त मंडळ तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.