Breaking News

दलित तरुणाला मारहाण; आ.जिग्नेश मेवाणीने दिला गुजरात बंदीचा इशारा

Jignesh Mewani
अहमदाबाद
अहमदाबाद येथील साबरमती परिसरात एका दलित तरुणाला किरकोळ कारणावरून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर संबंधित तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साबरमती परिसरातील महेश ठाकोर यांच्या हॉटेलमध्ये प्रज्ञनेश परमार गेला होता. प्रज्ञनेशकडून चुकून एक ताट खाली पडले. या किरकोळ कारणावरून महेश ठाकोर, जोगी ठाकोर आणि अन्य दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रज्ञनेश जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंदर्भात पोलीस निरीक्षक आर.एच.वाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री जेव्हा हॉटेलमध्ये प्रज्ञनेशकडून ताट खाली पडले तेव्हा मारहाण करणार्‍यांनी प्रथम त्याच्यासोबत बाचाबाची केली. त्यानंतर अपशब्द वापरले आणि मग त्याला मारहाण केली.

या प्रकरणी महेश ठाकोर आणि अन्य तिघांच्या विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणार्‍यांपैकी महेश याला अटक करण्यात आली असून अन्य तिघांचा शोध सुरु आहे. या घटनेनंतर दलित नेते आणि अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी आरोपींना जर 24 तासात पकडले नाही तर गुजरात बंदची घोषणा केली जाईल असा इशारा दिला आहे.

यासंदर्भात त्यांनी ट्विटकरून दलित तरुणावर झालेल्या अत्याचाराचा फक्त निषेध केला जाणार नाही तर आंदोलन केले जाईल. जर सरकारने आरोपींना अटक केली नाही तर गुजर बंदची घोषणा केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.