Breaking News

शहरात कचर्‍याची जटील समस्या

अहमदनगर/प्रतिनिधी
शहर व उपरनगरात कचर्‍याची समस्या ही जटील होत चालली असून शहरात रोज जमा होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कार्यरत आहे. रोज सकाळी शहरातील कचरा साफ केला जातो. चौकात ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्यात जमा होणारा कचरा तसेच वॉर्डातील कचरा घेऊन जाण्यासाठी घंटागाड्या कार्यरत आहेत.
या सर्व गोष्टी व्यवस्थित असल्या तरी महापालिकेची यंत्रणा कमी पडताना दिसत आहे. परिणामी कचरामुक्त शहर करणे शक्य झालेले नाही. शहरात दिवसभरात कचरा मोठ्या प्रमाणावर जमा होतो. त्यामुळे या गोष्टीचा विचार करून कचरा संकलन व्यवस्थित होणे अपेक्षित आहे. परंतु, शहरातील कचर्‍याकडे पाहिल्यास तसे झाल्याचे दिसत नाही.
शहरातील महत्त्वाच्या चौकांतील कचरा दुपारपर्यंत उचलला जात नाही. कचराकुंड्यांमध्ये कचर्‍याची आवक सुरूच असल्याने कुंड्या भरून गेल्या आहेत. हा कचरा रस्त्यावर पसरला जात आहे. काही ठिकाणी कचरा गटारात गेल्यामुळे गटारी तुंबल्या आहेत. त्यामुळे कचर्‍याची योग्य पद्धतीने विल्हेवाट केली जावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.