Breaking News

आम्ही सुडाचे राजकारण करणार नाही : संजय राऊत

मुंबई
वेगवेगळ्या केंद्रीय तपास संस्था केंद्र सरकारच्या ताब्यात असतात. त्यांनी चौकशांचा ससेमिरा कितीही मागे लावला तरी आमच्या सरकारला काहीही फरक पडणार नाही. आम्ही  कोणत्याही स्थितीत सुडाचे राजकारण करणार नसल्याचे नियोजित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी  पत्रकारांना सांगितले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आज सत्तेवर येत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या  पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर आरोप असलेल्या आदर्श घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा वेगवान होणार असल्याचे वृत्त काही माध्यमांमध्ये आले. त्या पार्श्वभूमीवर  संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले. कोणत्याही स्थितीत आमचे सरकार पाच वर्षे चालेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी आताच एकदम आदर्श घोटाळ्याच्या चौकशीचा विषय  पुन्हा एकदा कसा काय वर आला, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये कोणताही विसंवाद नाही. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर  विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळणार हे निश्चित झाले आहे. या पदावर कोणाला नेमायचे, याचा निर्णय संबंधित पक्षाचे अध्यक्ष किंवा वरिष्ठ नेते घेतील, असे सांगून संजय  राऊत म्हणाले, आदित्य ठाकरेंना मंत्रिपद द्यायचे की नाही, याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. ते आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे तेच कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचे याचा  निर्णय घेतील, असे स्पष्ट करण्यात आले. काँग्रेस नेते अशोक चव्हाण सत्तेत येताच अचानक त्यांचं नाव कसं काय ईडी चौकशीसाठी समोर आलं, हा प्रश्न पडतो.
राष्ट्रपती भवन ते राजभवन आणि सीबीआय ते ईडी अशा केंद्राच्या ताब्यातील सर्व संस्थांचा वापर राज्यातील सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी केला जात आहे. शिवसेनेच्या  नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊ नये, यासाठी महिनाभरात हरतऱ्हेचे प्रयत्न झाले, असा आरोपही संजय राऊत यांनी केला