Breaking News

न्यायालयातील निकालानंतर फिरले सत्ताचक्र

नवी दिल्ली
राज्यात सत्तास्थापनेसाठी सुरू असलेला संघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पूर्णपणे बदलल्याचे दिसून आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही तासांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील बहुमताअभावी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्रकारपरिषदेत जाहीर केले. त्यानंतर काही मिनिटांमध्ये त्यांनी राजभवनांत दाखल होऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.
मात्र त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडे सगळयांचे लक्ष होते. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत न्यायलयाने उद्या म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी पूर्ण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या मतदानाचे थेट प्रक्षेपण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. लोकशाही मूल्यांचे रक्षण होणे आवश्यक आहे. लोकांना चांगले सरकार मिळणे हा मुलभूत अधिकार आहे. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्या (27 नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश आम्ही देत आहोत, असे न्यायामूर्तींनी स्पष्ट केले. न्या. एन व्ही रमणा, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणी निकाल दिला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट रात्रीतून उठविणे आणि फडणवीस सरकारला तातडीने विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान घ्यायला लावण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेसाठी रविवारीही सुटीच्या दिवशी न्यायालयाचे कामकाज सुरू होते. रविवार आणि सोमवार दोन्ही दिवस न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सविस्तरपणे ऐकून घेतला. त्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निकालाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी स्वागत केले आहे. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आजच आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली. सत्याचा कायम विजयच होत असतो. त्याचा कधीही पराभव केला जाऊ शकत नाही, असे शिवसेनेने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लपून छपून स्थापन झालेल्या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही. आमच्याकडे 170 आमदारांचे पाठबळ आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे भाजप बुधवारी विधानसभेत नक्कीच उघडा पडेल. आज देशभरात संविधान दिवस साजरा होत असतानच आलेला हा निकाल निश्‍चितपणे समाधानकारक आणि दिलासा देणारा असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.


सर्वोच्च न्यायालयातील निकालातील महत्त्वाचे मुद्दे

- बुधवारी पाच वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा
- शपथविधी झाल्यानंतर बहुमत सिद्ध करा
- गुप्त मतदान पद्धत नको
- विश्‍वासदर्शक ठरावाचे लाईव्ह चित्रीकरण करा
- बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करा
- हंगामी अध्यक्षच बहुमत चाचणी घेणार