Breaking News

सत्ताधार्‍यांच्या विरोधात जनआंदोलन उभारणार

अहमदनगर/प्रतिनिधी
“सत्तेचा दुरूपयोग करुन भ्रष्टाचार संपण्याऐवजी सत्ताधार्‍यांची अनागोंदी निर्माण झाली असताना या विरोधात राष्ट्रीय पातळीवर इंडिया अगेन्स्ट गव्हर्नन्स इन्ट्रॉपी (प्रशासकीय अनागोंदी विरोधी जनआंदोलनाची) घोषणा करण्यात आली आहे’’, अशी माहिती अशोक सब्बन यांनी दिली.
देशभर गाजलेल्या 70 हजार कोटी रुपयांच्या जलसंपदा विभागातील सिंचन घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाच्या 9 फायली बंद करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना क्लीनचिट दिली. भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना हे बक्षीस मिळाले आहे तर भाजपने त्यांना पवित्र करुन घेतले आहे. उच्च न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना या निकालापूर्वीच त्यांना दिलासा देण्यात आला आहे. सत्तेचा दुरूपयोग करुन भ्रष्टाचार फोफावण्याचा प्रयत्न चालू असल्याचा आरोप सब्बन यांनी केला आहे.
या पद्धतीने सत्तेचा दुरूपयोग होत असल्याने यावर वचक व सर्वसामान्य नागरिकांचा दबाव ठेवण्यासाठी इंडिया अगेन्स्ट गव्हर्नन्स इन्ट्रॉपी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपबरोबर आलेल्यांची सर्व भ्रष्टाचार व प्रकरणे दडपली जात आहे. सत्तेसाठी भाजप गंगेच्या रुपात पाप धुण्याचे काम करीत असून, ईडीच्या माध्यमातून देखील याची प्रचिती जनतेला आली आहे. भ्रष्टाचार लपविण्याच्या राजकीय अनागोंदी विरोधात हे आंदोलन कार्य करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या आंदोलनाला व्यापक स्वरुप देण्यासाठी अशोक सब्बन, अ‍ॅड. कारभारी गवळी, कॉ.बाबा आरगडे, माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे, सुधीर भद्रे, कैलास पठारे, प्रा. बालाजी कुम्पलवार (नांदेड), डॉ. शिवानंद कुंभारे (गडचिरोली), संजय माने (सातारा), प्रभाकर कोंडालकर (पुणे), निवृत्त कर्नल दिनेश जैन (चंदीगढ), प्रभू नारायण (दिल्ली), संजय माने (सातारा), चंद्रशेखर (हैदराबाद), शरद मिराशी (कोल्हापूर) प्रयत्नशील आहेत.
इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली मोठे जनआंदोलन उभे राहिले. मात्र याच्या प्रमुख सूत्रधारांना मुख्यमंत्री, गव्हर्नर व केंद्रीय मंत्रीची संधी मिळाल्याने या चळवळीला खीळ बसली. याचा फायदा घेत देशात पुन्हा भ्रष्टाचाराची राजकीय अनागोंदी निर्माण झाली आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या धर्तीवर इंडिया अगेन्स्ट गव्हर्नन्स इन्ट्रॉपी हे जनआंदोलन महाराष्ट्रासह देशात उभे राहणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांच्या भांडणात सर्वसामान्य जनता, शेतकरी यांचे प्रश्‍न गंभीर बनले आहे. तर नोकरशाही मृतावस्थेत गेली आहे. प्रत्येक नागरिकाने या राजकीय अनागोंदी विरोधात लढण्याची गरज आहे. ब्रिटीशांपेक्षा वाईट दिवस राजकारण्यांनी आणले असून, सरकार स्थापन झाले नसल्याने महाराष्ट्राचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. सत्ताधारी अधिकाराचा दुरोपयोग करीत असताना जनता तटस्थ राहिल्यास लोकशाहीचा बट्ट्याबोळ होणार असल्याचा धोका अ‍ॅड. कारभारी गवळी वर्तवला आहे.