Breaking News

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक

डॉ. क्षितीज घुले यांचे प्रतिपादन , पांडुरंग अभंग यांचा ज्ञानेश्‍वर कारखान्याच्या वतीने सत्कार

भेंडा/प्रतिनिधी
मनुष्यबळाची कमतरता असलेल्या देशात यांत्रिकीकरण व स्वयंचलित साधनांचा वापर करण्यात येतो. शेतीबाबत लोकांमध्ये तेथे स्वयंशिस्त आहे. वेळेचा सदुपयोग केला जातो. हे गुण आत्मसात करून आपणही आपल्या व्यापारात, व्यवसायात, उद्योगात आणि पारंपरिक शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक डॉ.क्षितिज घुले यांनी केले.
भेंडा येथील ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे तज्ज्ञ संचालक पांडुरंग अभंग हे 15 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड देशाच्या अभ्यास दौर्‍यावरुन परतले. त्याबद्दल त्यांचा ज्ञानेश्‍वर उद्योग समुहाच्या डॉ. क्षितिज घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ज्ञानेश्‍वरचे संचालक काशिनाथ नवले, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, बापूसाहेब सुपारे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम मिसाळ, तालुका कार्याध्यक्ष दादा गंडाळ, ऊस तोड-वाहतूक मजूर संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे, मोहनराव गायकवाड, भगवानराव गायकवाड, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, सिव्हिल इंजिनिअर रवींद्र मोटे, प्रशासकीय अधिकारी कारभारी गायके, जनसंपर्क अधिकारी कल्याण म्हस्के, सुनील शिंदे, रामनाथ गरड, भगवान शेंडगे, नामदेव पुंड, विलासराव लोखंडे, बाळासाहेब आरगडे, विनोद गाडगे यावेळी उपस्थित होते.
अभ्यास दौर्‍याचा अनुभव सांगताना माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे कमी लोकसंख्या आणि भारतापेक्षा तीनपट जास्त क्षेत्रफळ असलेले देश आहेत. माणसं कमी आणि सुधारणा जास्त आहेत. पर्यटन हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. शेती, व्यवसाय आणि उद्योगात एक किंवा दोनच माणसांचा वापर करून जास्तीत जास्त यांत्रिकीकरण व स्वयंचलित यंत्रणांचा वापर करण्यात आलेला आहे. 500 गायींचा डेअरी फार्मचा व्यवसाय केवळ दोनच माणसं सांभाळतात. यंत्रांच्या सहाय्याने अवघ्या 10 मिनिटात 100 गायींचे दूध काढले जाते.
तेथील माणसांमध्ये स्वयंशिस्त, प्रामाणिकपणा आणि वेळेचा पुरेपूर वापर करण्याचे गुण आहेत. आपण ही हे गुण आत्मसात केले तर आपला देश ही खूप पुढे जाईल, असेही अभंग म्हणाले.