Breaking News

‘गुगल पे’मुळे फसवणुकीच्या जाळ्यात; हजारो लुटले

मुंबई
 सर्वच ठिकाणी ऑनलाइन आर्थिक व्यवहार करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी हे व्यवहार करण्याचे पुरेसे ज्ञान नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. ’गुगल पे’च्या माध्यमातून पैसे पाठविण्यास सांगून लोकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार मुंबईत वाढले आहेत. ‘गुगल पे’साठी लिंक पाठवून ऑनलाइन भामटे बँक खात्यातील हजारो रुपये परस्पर उकळत असल्याचे समोर आले आहे.
ऑनलाइन खरेदी करण्यासाठी सध्या ‘गुगल पे’ हे माध्यम मोठ्या प्रमाणात वापरले जाते. मात्र हे माध्यम कसे वापरावे, कोणती काळजी घ्यावी याबाबत पुरेशी माहिती नसते. प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड करून केवळ पैसे ट्रान्सफर कसे करायचे ते शिकवले जाते. त्यापलीकडे याबाबत बहुतांश लोकांना माहिती नसल्याने ऑनलाइन भामटे लोकांची फसवणूक करतात. मुख्य म्हणजे अनेकदा सुशिक्षितही या भामट्यांचे बळी ठरतात.

कस्टमर केअरही धोकादायक

अनेकदा लोक आपली तक्रार करण्यासाठी गुगलवर जाऊन कस्टमर केअरचा नंबर शोधतात आणि त्यावर संपर्क करून आपली तक्रार करतात़. लोकांच्या या सवयीचा गैरफायदा ऑनलाइन भामटे घेतात. गुगलवर सायबर हॅकर्स अनेकदा वेगवेगळ्या कंपनीचे बनावट कस्टमर केअर नंबर टाकत असतात़. बर्‍याचदा कंपनीच्या नावात मामुली बदल करण्यात येतो तो सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येत नाही. कस्टमर केअरमधून बोलणारा प्रतिनिधी हा हॅकर्स असतो आणि तो बँक तपशील आणि इतर माहिती घेऊन ऑनलाइन पैसे काढले जातात.
अलीकडील काही घटना
- लोअर परळ येथील पूजा पंडित यांनी ऑनलाइन मागविलेले पार्सल आले नाही म्हणून कस्टमर केअरमध्ये चौकशी केली. मदत करणार्‍या व्यक्तीने त्यांचा बँक तपशील आणि ‘गुगल पे’चा पिन नंबर घेऊन दोन लाख काढले.
- कोटक महिंद्रा बँकेत काम करणार्‍या एका तरुणीने नोकरी मिळावी यासाठी ऑनलाइन नोंदणी केली. नोकरीच्या बहाण्याने या तरुणीकडून ‘गुगल पे’च्या माध्यमातून 95 हजार उकळले
- खासगी कंपनीत नोकरी करणार्‍या महिलेने सोफा कम बेड ऑनलाइन विक्रीसाठी ठेवला. खरेदी करणार्‍याने या महिलेच्या ‘गुगल पे’चा तपशील घेऊन पैसे देण्याऐवजी 12 हजार लांबविले
- गॅस दुरुस्तीसाठी ‘गुगल पे’ वरून दहा रुपये पाठविण्यास सांगून गॅस प्रतिनिधी म्हणवणार्‍याने पवईतील तरुणाच्या खात्यातून 30 हजार रुपये काढून घेतले
- नवीन क्रेडिट कार्डसाठी दोन रुपये ‘गुगल पे’ करण्यास सांगून अँटॉप हिल येथील अमिताभ राजवंश याच्या खात्यातून 50 हजार परस्पर वळविण्यात आले.
हे लक्षात असू द्या!
- ऑनलाइन वस्तू मागविताना कॅश ऑन डिलिव्हरीच्या पर्यायाला प्राधान्य द्यावे.
- खात्री पटत नाही तोपर्यंत त्यांना ’गुगल पे’ अथवा अन्य पेमेंट अ‍ॅपवर पैसे पाठवू नयेत.
- बँक खात्याचा तपशील व गोपनीय क्रमांक कधीही शेअर करू नये.
- कोणात्याही व्यवहारासाठी ’गुगल पे’ची लिंक पाठविण्याची गरज नसते.
- ‘गुगल पे’च्या लिंकमधील आपल्या माहितीचा सायबर हॅकर्सना फायदा होतो.