Breaking News

नवी मुंबईत ‘महाविकास आघाडी’ कठीण?

नवी मुंबई 
 शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा ‘प्रयोग’ राज्यात यशस्वी होत असताना या नवीन प्रयोगाला येत्या पाच महिन्यांत होऊ घातलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अपशकून होण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या 49 नगरसेवकांपैकी अनेक नगरसेवक स्वगृही वा शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची ताकद पुन्हा वाढणार आहे. त्याचवेळी स्थानिक पातळीवरील राजकीय स्पर्धेमुळे एकत्रितपणे हे तिन्ही पक्ष निवडणुकीला सामोरे जाणे कठीण असल्याचे दिसत आहे.
राज्यातील नवीन सत्ता समिकरणांच्या पार्श्‍वभूमीवर पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणार्‍या नवी मुंबई पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडी होणार का याची चर्चा सुरूझाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाताना गणेश नाईक यांनी पक्षाचे 49 नगरसेवकही नेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसच्या 10 नगरसेवकांपैकी पाच नगरसेवकही भाजपात गेले. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे पुरते खच्चीकरण झाले आहे. मात्र, राज्यात शिवसेनेसोबत या पक्षांनी सत्ता काबीज केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
केंद्र आणि राज्यात एकच सरकार अस्तित्वात येणार असल्याची खूणगाठ बांधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नाईकांना आता पालिकेची निवडणूक एक मोठे आव्हान ठरणार आहे. नवी मुंबईत नाईक विरुद्ध सर्व असे चित्र प्रत्येक निवडणुकीत दिसून आले आहे. भाजपाच्या मूळ सहा नगरसेवकांसह नाईक समर्थकांची ताकद बहुमतापर्यंत गेल्याने पालिकेवर अघोषित भाजपाची सत्ता आहे. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी राज्यात झालेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग नवी मुंंबईत करण्याच्या हालचाली आत्तापासून सुरु झालेल्या आहेत.
111 नगरसेवकांच्या नवी मुबंई पालिकेत शिवसेनेचे सध्या 38 नगरसेवक असून विरोधी पक्षनेते पद या पक्षाकडे आहे. मात्र, नाईक यांच्या बरोबर गेलेल्या 49 नगरसेवकांपैकी 12 नगरसेवक हे शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता आल्याने ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेला या खेपेस पालिकेवर भगवा फडकविण्याची खात्री वाटू लागली आहे. विधानसभा निवडणूकीतील उमेदवारी वाटपाच्या अपमानाचा वचपा काढण्याची तयारी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सुरू केली आहे. त्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेण्याची तयारी स्थानिक शिवसेनेची आहे मात्र नवी मुंबईत युती, आघाडीच्या निवडणूका आतापर्यत लढल्या गेलेल्या नसल्याचा अनुभव आहे.
एकेकाळी पालिकेच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी पक्षाला पालिका निवडणूकीत समसमान प्रभाग वाटप लागणार आहे, तर काँग्रेसलाही  कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासाठी जादा प्रभागांची अपेक्षा आहे. यावेळची निवडणूक ही पॅनल पद्धतीने होणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीत या तीन पक्षांची जागा वाटपावरून खेचाखेची होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे राज्याची सत्ता स्थापन करण्यासाठी या तीन पक्षांची महाविकास आघाडी झाली असली तरी भाजपला निवडणूक पूर्वी टक्कर देण्यासाठी ही महाविकास आघाडी होणे शक्य नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.