Breaking News

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांनी काढला ‘चिमटा’

मुंबई
दादरच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील हे उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. नव्या मुख्यमंत्र्यांवर सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ’ट्विटर’च्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. ’महाराष्ट्रात विरोधी पक्षच राहणार नाही’, असा दावा करणारे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छांचे ट्वीट करून राऊतांनी उपहासात्मक टोला लगावला आहे. दरम्यान, भाजपने विरोधी पक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील उपस्थित होते. मात्र, दोन्ही नेते उद्धव ठाकरे यांची भेट न घेताच ंनिघून गेले होते. यावरही संजय राऊत यांनी आभाराचे ट्वीट केले आहे. ’शिवसेना मुख्यमंत्री महोदयांच्या शपथग्रहण सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना मनापासून धन्यवाद. हे नाते असेच राहू दे.’ असे राऊतांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे
राज्यात बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलेल्या भाजपने विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांची भाजपने विधान सभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे. भाजपचे विधानसभेत 105 आमदार आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारला कोंडीत पकडण्यासाठी कंबर कसली आहे. ’कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपून-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली,’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या मोठ्या सत्तानाट्यानंतर गुरूवारी अखेर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. पण त्यानंतर लगेचच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बहुमत सिद्ध करण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारवर पहिली तोफ डागली. त्यामुळे या पुढची लढाई कशी राहील, याचे संकेत मिळाले आहे. नव्या सरकारचा जो किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यात घोषणांचा पाऊस आहे. मात्र, राज्याच्या मागासलेल्या भागासाठी काहीही नाही, अशी टीका फडणवीसांनी केली. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी
आशा करू या!

उपस्थित केले हे सवाल

* शेतकर्‍यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपून-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी?
* या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? ,
* नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? ,
* स्वतच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्‍वास का? ,
* अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का?,
* भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का?