Breaking News

नक्षलवादी हल्ल्यात चार पोलिस हुतात्मा

झारखंड
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला आहे. नक्षलवाद्यांनी लातेहार जिल्ह्यात पोलिसांना लक्ष्य करत हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 4 पोलिस हुतात्मा झाले. येत्या 30 नोव्हेंबर रोजी झारखंडमध्ये मतदान होणार आहे. या हल्ल्याने सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांचे पथक वाहनातून गस्त घालत होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्या गाडीला लक्ष्य केले. ही घटना लातेहार जिल्ह्याच्या चंदवा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. या हल्ल्यानंतर पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. मात्र नक्षलवादी फरार झाले. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलिस उपनिरिक्षक सुकिया उरांव, कॉन्स्टेबल दिनेश कुमार, कॉन्स्टेबल सिकंदर सिंह, गाडी चालक यमुना राम हे शहीद झाले. या घटनेनंतर झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी दु:ख व्यक्त केले. 30 नोव्हेंबर रोजी लातेहार, गडवा, पलामू, गुमला, लोहरदगा आणि चतरा जिल्ह्यातील 13 विधानसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. हे सर्व जिल्हे नक्षल प्रभावित आहेत.