Breaking News

पटेल-गडकरी भेटीची चर्चा गुलदस्त्यात

नवी दिल्ली
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असतांनाच दिल्लीमध्ये काँगे्रसचे अहमद पटेल यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास पटेल यांनी गडकरींची भेट घेतली. मात्र या भेटींचा तपशील मिळू शकलेला नाही. 
राजकीय सत्तासंघर्षावर चर्चा करण्यासाठी या दोन नेत्यांची भेट झाल्याची चर्चा असली तरी या भेटीचा महाराष्ट्रातील राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचे पटेल यांनी या भेटीनंतर स्पष्ट केले आहे. सोनिया गांधीचे निकटवर्तीय समजले जाणारे अहमद पटेल गडकरींच्या भेटीला गेल्याने राज्यातील शिवसेनेची गणिते बिघडू शकतात अशी नवी चर्चा सुरु झाली होती. पटेल हे सोनिया गांधीचे निकटवर्तीय असून ते सध्या काँग्रेसमधील दुसर्‍या क्रमांकाचे नेते आहेत. काँग्रेसचे अनेक निर्णय पटेल यांच्याच सल्ल्याने होतात. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय तिढा सोडवण्यासाठीच ही भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली. मात्र आपण शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी गडकरींची भेट घेतल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले आहे. गडकरींची भेट घेतल्यानंतर पटेल म्हणाले की, मी शेतकर्‍यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी नितीन गडकरींची भेट घेतली. ही राजकीय बैठक नव्हती. महाराष्ट्रातील राजकारणावर या बैठकीमध्ये चर्चा झाली नाही, असे पटेल यांनी सांगितलं. राज्यामध्ये सत्ता स्थापनेवरुन शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपा सत्ता स्थापन करणार नसेल तर शिवसेना सत्ता स्थापन करेल असा दावा केला आहे. असे असले तरी शिवसेनेच्या सत्ता स्थापनेची मदार ही काँग्रेसच्या भूमिकेवर अवलंबून आहे.