Breaking News

शपथविधी सोहळयात शेतकर्‍यांना मानाचे स्थान

उद्धव ठाकरे यांच्याकडून 400 शेतकर्‍यांना निमत्रंण

Uddhav Thakare
मुंबई
अखेर राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. उद्धव ठाकरे आज गुरूवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. या शपथविधीच्या कार्यक्रमाला राज्यातील 400 शेतकर्‍यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना देखील शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली.
बळीराजाचे राज्य म्हणून शपथविधी सोहळ्यासाठी शेतकर्‍यांना बोलावण्यात आले असल्याचे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तिन्ही पक्षांकडून शेतकर्‍यांना बोलावण्यात आले असून त्यांच्या बसणयाची योग्य ती व्यवस्था शपथविधी स्थळी करण्यात आली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. गुरुवारी सायंकाळी होणार्‍या या भव्य शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. तसंच, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्व काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरेंची निवड करण्यात आली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालं. उद्धव ठाकरे यांचा शपथविधी शिवाजी पार्क या शिवतीर्थावर होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या शपथविधीसाठी देशभरातील दिग्गज नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. पंतप्रधानांपासून विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना, विविध देशांच्या राजदूतांना, तसेच शेतकर्‍यांपासून वारकर्‍यांपर्यंत, व्हीआयपीपासून व्हीव्हीआयपीपर्यंत निमंत्रण देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला एक खास शेतकरी सांगलीवरून येणार आहे. संजय सावंत असं या शेतकर्‍याचं नाव आहे. उद्धव ठाकरे हे सांगली दौर्‍यावर होते त्यावेळी या शेतकर्‍याने त्यांची भेट घेतली होती. शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना स्टेजसमोर मला जवळ उभं करा. अशी विनंती संजय सावंत यांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी ‘तुमचा संपर्क क्रमांक द्या, मी तुम्हाला शपथविधी सोहळ्यात स्टेजवर उभं करतो.’ असं आश्‍वासन दिलं होतं. शिवसेनेने संजय सावंत यांना निमंत्रित केलं असून, ते सांगलीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. संजय सावंत आणि त्यांची पत्नी रूपाली सावंत हे दाम्पत्य, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून, पाच दिवस निरंकार उपवास करत 85 किलोमीटर अनवाणी पायाने विठ्ठल दर्शनाला पंढरपूरला गेले होते. उद्धव ठाकरे 15 नोव्हेंबरला सांगली दौर्‍यावर होते. त्यावेळी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना पंढरपूरमधून आणलेली तुळशीची माळ आणि चंद्रभागेमधील तीर्थ भेट दिले होते. उद्याच्या शपथविधीसाठी मुंबईत शिवतीर्थावर संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे.