Breaking News

सर्वाधिक डेंग्यूबळी महाराष्ट्रात

देशात पाच वर्षांत डेंग्यू, चिकनगुनिया रुग्णसंख्या तिप्पट

मुंबई
पायाभूत सुविधांविनाच वाढते शहरीकरण, अनियमित पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचा प्रादुर्भाव देशात गेल्या पाच वर्षांत जवळपास तिपटीने वाढल्याचे राष्ट्रीय आरोग्य अहवालावरून स्पष्ट झाले आहे. 2017 पाठोपाठ 2018 मध्येही देशभरात सर्वाधिक डेंग्यूबळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. चिकनगुनियाच्या रुग्णांमध्येही पाच वर्षांत 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. दोन्ही आजारांवर नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकारला फारसे यश आलेले नसल्याचे अहवालावरून दिसते.
या अहवालानुसार, देशात डेंग्यूचा प्रादुर्भाव 1950 पासून आहे. परंतु, गेल्या दोन दशकांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढले. देशात 2014 मध्ये जवळपास 40 हजार डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. 2018 मध्ये हा आकडा एक लाखाच्याही वर पोहोचला. राज्यात 2014 पासून डेंग्यूचा फैलाव मोठया प्रमाणात झाला. देशातील डेंग्यूच्या एकूण बळींपैकी जवळपास 20 टक्के बळींची नोंद राज्यात झाली. त्यापाठोपाठ तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, गोवा या किनारपट्टीवरील राज्यांमध्ये डेंग्यूच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. कर्नाटकला यंदा डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात यश आले आहे. 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये या राज्यात डेंग्यूचे रुग्ण आणि मृत्यू यामध्ये अनुक्रमे 75 टक्के आणि 60 टक्क्यांनी घट झाली. चिकनगुनियाचे प्रमाणही राज्यात 2014 पासून 203 वरून 2018 पर्यंत 1 हजारावर पोहचले आहे.
2015 पासून डेंग्यूची अधिसूचित आजार अशी नोंद केल्याने खासगी रुग्णांच्याही नोंदणीस सुरुवात झाली. त्यामुळेही रुग्णसंख्येत भर पडली आहे. अनियमित पाऊस, सातत्याने वातावरण बदल हे घटक यासाठी कारणीभूत आहेत. डेंग्यूचा फैलाव वाढल्यानंतर चिकनगुनियाही वाढण्याची शक्यता असते. आतापर्यंत चिकनगुनिया प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळत होता. परंतु, हा आजार शहरी भागांतही दिसून येतो. शहरे विस्तारताना आरोग्याच्या पायाभूत सुविधा मात्र अपुर्‍या पडतात. विकासकामांचा आरोग्यावर होणार्‍या परिणामाचा अभ्यास अजूनही केला जात नाही