Breaking News

दिल्लीत पोलिसानंतर वकिलांचे काम बंद आंदोलन

एका वकीलाचा इमारतीच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न

Delhi Lawyers
नवी दिल्ली
दिल्ली पोलिस आणि वकीलांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर पोलिसांनी 11 तासांचा सत्याग्रह करत आंदोलन केले होते. पोलिसांच्या या सत्याग्रहानंतर जनजीवन प्रभावित झाले होते. त्यानंतर बुधवारी दिल्लीतील वकिल रत्यावर उतरून काम बंद करत, आंदोलन केले. दिल्लीतील पाच जिल्हा न्यायालयांच्या वकिलांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.
पतियाळा हाऊस कोर्ट, साकेत कोर्ट, रोहिणी कोर्ट, कडकड्डूमा कोर्ट आणि तीस हजारी कोर्टात वकिल आंदोलने केली. रोहिणी कोर्ट परिसरात एक वकील इमारतीवर चढला. आरोपी पोलिसांविरोधात कारवाई करण्याची मागणी करत या वकिलाने आत्महत्येचा इशारा दिला. खूप वेळ हे नाट्य सुरू होते. कोर्ट परिसरात यामुळे एकच गोंधळ उडाला होता. काही वेळानंतर त्याला इमारतीवरून सुखरुप उतरविण्यात आले. रोहिणी कोर्टाबाहेरही एका वकिलाने स्वत:वर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. तीस हजारी कोर्टात मंगळवारी वकिल आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. वकिलांनी पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिल्लीतील पोलिस संतप्त झाले. त्यांनी पोलिस मुख्यालयासमोर एकत्र येत धुमसणार्‍या रोषाला वाट मोकळी करून दिली. दिल्लीत सुमारे 85 हजार पोलिस कर्मचारी असून, कामाचा तणाव आणि सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या मानहानीमुळे त्यांचा असंतोष उफाळून आला. त्यामुळे मंगळवारी दिल्लीने 12 तास अभूतपूर्व परिस्थिती अनुभवली. पोलिसांच्या या आंदोलनामुळे शहरात काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थाही कोलमडली होती. त्यातच सायंकाळी पुन्हा पोलिसांनी मेणबत्ती मोर्चा काढून आपल्यावरील अन्यायाकडे लक्ष वेधले. दरम्यान, यानंतर मंगळवारी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या दिल्ली पोलिसांनी बंडाचा उघड पवित्रा घेतल्यामुळे राजधानीतील वातावरण अकस्मात तापले. शनिवारी वकील आणि पोलिस यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीनंतर वकिलांविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीवरून गणवेशातील दिल्ली पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सकाळपासून दिल्ली पोलिस मुख्यालयासमोर निदर्शने केली. सहकार्‍यांची समजूत काढण्यासाठी आलेल्या दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांना देखील मोठया रोषाला सामौरे जावे लागले होते.

‘केंद्र सरकारला जबाबदारी टाळता येणार नाही’
दिल्लीत पोलिसांवर ज्याप्रकारे हल्ला करण्यात आला, ती बाब निषेधार्ह आहे. यासंदर्भातील जबाबदारी केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला टाळता येणार नसल्याचे राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. गणवेशात असलेल्या पोलिसांवर हल्ले होतात, ही बाब दुर्दैवी आहे. देशातल्या सगळ्याच राज्यांमध्ये पोलिसांची अवस्था फारशी चांगली नाही. अनेकदा त्यांना 18 तास ड्युटी करावी लागते असे शरद पवार यांनी म्हटले आहे. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी ही चिंता व्यक्त केली. पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी दिल्लीच्या नागरिकांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. पोलिसांना आठवड्याची सुटीही मिळत नाही याबाबतही त्यांनी खंत व्यक्त केली.