Breaking News

क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण गोलंदाजानेच लावावे

कपिलदेव आणि सचिन तेंडुलकरने सुचवले बदल

Kapil Sachin
मुंबई
क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण बदल करण्यासाठी सचिन तेंडुलकर आणि कपिल देव बदल सुचवले आहेत. क्रिकेटचे नियम, सामन्यांचे आयोजन आणि स्पर्धाच्या रुपात सातत्याने बदल होत  त्यादृष्टीने भारताचे पहिले विश्‍वविजेते कर्णधार कपिल देव आणि सर्वात यशस्वी फलंदाज सचिन तेंडूलकर यांनीही काही उपाय सुचवले आहेत. त्यात प्रामुख्याने सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण हे कर्णधाराला हवे तसे न लावता गोलंदाजाला पहिजे तसे लावायला हवे असे चारशेच्यावर कसोटी बळी नावावर असलेल्या कपिल देव यांनी म्हटले आहे तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे स्वरूप बदलण्याचा उपाय सुचवला आहे.
कपिल देव यांच्या मते कोणताही गोलंदाज चांगला गोलंदाज तेंव्हाच ठरू शकतो जेंव्हा त्याला त्याच्या गरजेप्रमाणे क्षेत्ररक्षण लावता येते. कर्णधार त्याच्यासाठी योग्य क्षेत्ररक्षण लावू शकत नाही कारण आपण कशी गोलंदाजी करणार आहोत, कुठे चेंडू टाकणार आहोत हे गोलंदाजालाच माहित असते. मी कर्णधार होतो तेंव्हा मी गोलंदाजांना त्यांना कसे क्षेत्ररक्षण हवे ते विचारायचो. तुम्ही कशी गोलंदाजी करायची हे कर्णधार सांगेल तर काही उपयोगाचे नाही. गोलंदाजाने ठरवले पाहिजे, त्याच्याकडे योजना असली पाहिजे यावर माझा विश्‍वास होता. क्लाईव्ह लॉईड कधीच क्षेत्ररक्षण लावत नव्हते. गोलंदाज त्यांना कुठे क्षेत्ररक्षक हवेत ते सांगायचे. सर्व महान गोलंदाज त्यांचे क्षेत्ररक्षण स्वत:च लावतात असे दिसून येईल असे कपिल यांनी म्हटले आहे. यासंदर्भात भारतीय संघात रविचंद्रन अश्‍विन उत्तम उदाहरण आहे. तो स्वत:च क्षेत्ररक्षण रचून फलंदाजांसाठी जाळे टाकतो. याउलट रविंद्र जडेजा येतो आणि गोलंदाजी करतो त्यामुळे चांगला गोलंदाज असूनही त्याच्यासाठी विचार कर्णधाराला करावा लागतो. अश्‍विनप्रमाणेच हरभजनही त्याला पाहिजे तसे क्षेत्ररक्षण लावायचा. राजिंदर गोयल व बिशनसिंग बेदी यांच्यातही हाच फरक होता. गोयल हे कर्णधार सांगेल तसे गोलंदाजी करायचे तर बेदी हे त्यांना पाहिजे तीच गोलंदाजी करायचे हा फरक कपिल यांनी मांडला. जलद गोलंदाजांमध्ये आता बरेच बदल झाले आहेत. आता त्यांचे खांदे आणि पाय मजबूत असतात. डेनिस लिलीने सर्वांना शरीराच्या मजबुतीेवर मेहनत घेण्यास शिकवले आहे. प्रत्येक जण आता फिटनेसकडे लक्ष देतो आणि आपले महत्त्वाचे स्रायू मजबूत करण्यावर भर देतो.

दुलीप ट्रॉफीचे स्वरूप बदला
दुसरीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने दुलीप ट्रॉफी स्पर्धेचे स्वरुप बदलावे असे आपला सहकारी व बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना सूचवले आहे. या स्पर्धेत संघापेक्षा वैयक्तिक कामगिरीला अधिक महत्त्व दिले जात असल्याने बदल आवश्यक असल्याचे मास्टर ब्लास्टरने म्हटले आहे. या स्पर्धेत सांघिक भावना आणण्याची गरज मांडताना सचिनने म्हटलेय की, यात रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचलेले चार संघ आणि 19 व 23 वर्षाआतील प्रतिभावान खेळाडूंचे प्रत्येकी एक-एक संघ उतरवावेत. आगामी स्पर्धावर डोळा ठेवून खेळाडू दुलीप स्पर्धेत कामगिरी करत असतात.