Breaking News

भारतीय हॉकी संघांना ऑलिम्पिकसाठी कठीण गटात स्थान

Hockey
नवी दिल्ली
टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या हॉकी स्पर्धेसाठी भारतीय पुरुष व महिला संघांना कठीण गटात स्थान मिळाले आहे. दोन्ही संघाच्या गटात गतवेळच्या ऑलिम्पिक विजेत्या आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल संघांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी भारताचा पुरुष संघ ‘अ’ गटात असून या गटातच गेल्यावेळचे ऑलिम्पिक विजेते अर्जेंटिना आणि जगातील अव्वल ऑस्ट्रेलियन संघ आहे. याशिवाय स्पेन, न्यूझीलंड आणि यजमान जपानचे संघसुध्दा भारताच्याच गटात आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (एफआयएच) ने या गटांची घोषणा केली. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत रशियाला 11-3 अशी मात देत भारतीय संघ टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. ‘ब’ गटात विश्‍वविजेते बेल्जियम, नेदरलँडस्, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ आहेत. भारताच्या महिला हॉकी संघालासुध्दा ‘अ’ गटातच स्थान मिळाले आहे. महिला संघाच्या गटातही गतवेळचे ऑलिम्पिक विजेते ग्रेट ब्रिटन आणि अव्वल संघ नेदरलँडस आहेत. याशिवाय जर्मनी, आयर्लंड व दक्षिण आफ्रिका हे गटातील इतर संघ आहेत. महिला हॉकीच्या ‘ब’ गटात ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड, स्पेन, चीन आणि यजमान जपानचे संघ आहेत.
या महिन्याच्या आरंभीच भुवनेश्‍वर येथे ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत अमेरिकेवर 6-5 असा विजय मिळवत भारतीय महिला हॉकी संघ टोकियो 2020 साठी पात्र ठरला आहे.
टोकियो ऑलिम्पिकसाठीचे सर्व संघ जगातील अव्वल 16 संघातील आहेत. त्यामुळे चुरशीचे सामने बघायला मिळतील असे ‘एफआयएच’ ने म्हटले आहे. पुढील वर्षी 25 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिक हॉकी स्पर्धा रंगणार आहे.