Breaking News

नवीन सत्तासमीकरणांची नांदी !

राज्यात काळजीवाहू सरकार ; शिवेसेना-राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल

मुंबई
राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम असूून, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा सुपर्द करतांना शिवेसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राज्यात नवीन सत्तासमीकरण अस्तित्वात येण्याची चिन्हे दिसत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस, काँगे्रसच्या पाठिंब्यवर सत्ता स्थापन करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुहे युतीमध्ये मध्यस्थी करण्यास उद्धव ठाकरे यांनी सपशेल नकार दिला होता. मुख्यमंत्रीपदाबाबत बोलणी करणार असेल, तरच बोला असे म्हणत ठाकरे यांनी भाजपला दबाब वाढवला होता.
भाजप-शिवसेना दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर अडून बसल्यामुळे सत्तास्थापनेच्या शेवटच्या दिवशी कोणताही पक्ष सत्तास्थापनेचा दावा करू शकलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील हालाचालीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.  14 व्या विधानसभेसाठी राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमतांचा कौल दिला मात्र, युतीपक्ष शिवसेनेच्या अट्टाहासामुळे राज्यात मागील पंधरा दिवसांपासून सत्तासंघर्ष पेटला आहे. तो आजतागायत शमलेला नाही. शेवटपर्यंत शिवसेना नमती भूमिका घेणार आणि सामंजस्याने काही ठरेल आणि लवकरच राज्याला गोड बातमी मिळेल असे वारंवार भाजप नेते सांगत होते. महायुतीचीच सत्ता येईल असाच विश्‍वास भाजप नेते व्यक्त करत होते. मात्र, ती शक्यता आता मावळलेली दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मी फोन करुनही त्यांनी घेतला नाही अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. चर्चा आम्ही नाही तर शिवसेनेने थांबवली असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे मुख्यंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर सह्यादी अतिथीगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूची लोकं ज्याप्रकारे वक्तव्य करत आहेत, त्यांनी सरकार होत नसते, आम्हाला उत्तर देता येत नाही, असे समजू नये. जबरदस्त भाषेत उत्तर देण्याची क्षमता आमच्यातही आहे, पण आम्ही देणार नाही. आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. अडीच-अडीच वर्षे हा फॉर्म्युला ठरलेलाच नाही, हे मी आजही सांगतो आहे. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर आमची बोलणी फिस्कटली होती त्यानंतरच्या माझ्यासमोरच्या एकाही चर्चेत हा विषय झाला नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात जर विषय झालेला असेल तर मला माहित नव्हतं. मी तसं अमित शाह आणि नितीन गडकरी यांना विचारलं मात्र त्यांनीही असं काहीही ठरलेलं नाही असं सांगितलं. या संदर्भातले समज-गैरसमज चर्चेने सोडवता आले असते, असं मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं. मी पहिल्याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आभार मानत महायुतीचं सरकार येईल असं म्हटलं होतं असं सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत सरकार बनवण्याचे सर्व मार्ग खुले असल्याचं सांगितलं होतं, तो आमच्यासाठी धक्का होता, कारण जनतेने महायुतीला मतदान केलं होतं अशी माहिती दिली.राज्यपाल यांच्यासमोरील पर्याय
राज्यपाल आपल्या विवेधाधिन अधिकारांत पुढील व्यवस्था होईपर्यंत विद्यमान मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहण्यास सांगितले आहे. * राज्यपाल सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी पाचारण करू शकतात. या पक्षाने असमर्थता दर्शवल्यास दुसर्‍या मोठया पक्षाला पाचारण करणार्‍याचा पर्याय राज्यपालापुढे असू शकतो. त्यासाठी राजकीय पक्षांना ठरावीक मुदत दिली जाते.* कोणत्याच राजकीय पक्षाने सरकार स्थापन करण्यास समर्थता न दर्शविल्यास राज्यपाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारला करतात.* केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती तसा आदेश लागू करतात. या काळात राज्यपाल व त्यांनी नेमलेल्या सल्लागारांच्या सल्ल्यानुसार कामकाज पाहिले जाते. * राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास नव्याने अस्तित्वात आलेली विधानसभा निलंबित ठेवावी लागेल. * राष्ट्रपती राजवटीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाला 145 चा जादुई  आकडा गाठणे शक्य झाल्यास सरकार स्थापण्याचा दावा करता येईल. तसेच निलंबित विधानसभा पुन्हा कार्यरत होऊ शकते.


मनभेद दूर झाल्यास सत्तास्थापन करू : फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधतांना म्हणाले की, ज्यांच्याविरोधात मते मागितली त्या काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत चर्चा करायला वेळ होता पण आमच्याशी नाही असे म्हटले. चर्चा आम्ही थांबवलेली नाही, दारे खुली होती. परंतु चर्चा शिवसेनेकडून बंद झाली, यात पूर्ण सत्य आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विरोधी पक्षातील नेत्यांनी केलेली वक्तव्य आम्ही समजू शकतो. पण आमच्या सोबत केंद्रात आणि राज्यातही राहायचे आणि खालच्या पातळीवर टीकाही करायची, हे चालणारे नाही, असेही यावेळी त्यांनी सांगितले.