Breaking News

कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंडकडून इंग्लंडचा धुव्वा

पहिल्या कसोटी सामन्यातील विजयासह किवीज मालिकेत आघाडीवर

माऊंट माऊंगनुई (न्यूझीलंड)
नील वॅग्नरच्या भेदक माऱयाच्या बळावर यजमान न्यूझीलंडने पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडचा डावाने धुव्वा उडवला आणि 2 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. या लढतीत इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 353 धावा जमवल्यानंतर न्यूझीलंडने 9 बाद 615 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला आणि दुसऱया डावात इंग्लंडला सर्वबाद 197 धावांवरच गुंडाळत डावाने विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडने ही लढत एक डाव व 65 धावांनी जिंकली.
या विजयासह न्यूझीलंडने घरच्या भूमीत सलग सातव्यांदा अपराजित राहण्याची परंपरा अबाधित राखली. सोमवारी या लढतीच्या शेवटच्या दिवशी चहापानावेळी इंग्लंडचे शेवटचे दोन गडी बाकी होते. सॅम करन व जोफ्रा आर्चर यांची नवव्या गडयासाठी 59 धावांची भागीदारी हे ठळक वैशिष्टय ठरले. पण, सामन्यात शेवटच्या दिवशी 22 पेक्षाही कमी षटके बाकी राहिलेली असताना वॅग्नरनेच आर्चर व स्टुअर्ट ब्रॉड यांना सलग चेंडूंवर बाद केले आणि येथेच न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडने सोमवारी शेवटच्या दिवसाच्या खेळाला 3 बाद 55 धावांवरुन पुढे सुरुवात केली, त्यावेळी न्यूझीलंडला पुन्हा फलंदाजी करायला भाग पाडण्यासाठी त्यांना आणखी 207 धावांची गरज होती. पहिल्या 41 षटकात इंग्लंडने केवळ जो रुटचा एकमेव बळी गमावत 66 धावांसह संयमी फलंदाजी साकारली, ते लक्षवेधी ठरले. नंतर बेन स्टोक्सही जो डेन्लीच्या साथीला उतरला आणि या जोडीनेही किल्ला लढवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, उपाहारानंतर त्यांच्या संयमाचा अंत झाला आणि यानंतर झटपट गडी बाद होण्याचा जणू सिलसिलाच सुरु झाला. स्टोक्सने 28 धावांवर असताना टीम साऊदीच्या बाहेर जाणाऱया चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात तो स्वत:च्या यष्टीवर ओढवून घेतला. यावेळी एकही बळी खात्यावर नसलेल्या वॅग्नरने बाऊन्सर्सचा जोरदार मारा सुरु केला आणि जो डेन्ली, ऑली पोप व जोस बटलर यांना ठरावीक अंतराने बाद केले. यादरम्यान इंग्लंडने केवळ 17 धावातच 4 फलंदाज गमावले होते. इंग्लंडच्या पहिल्या डावात 74 धावांची दमदार खेळी साकारणाऱया डेन्लीने येथे यष्टीमागे झेलबाद होण्यापूर्वी 35 धावांचे सर्वाधिक योगदान दिले. 6 धावांवर असताना पोपने देखील स्टोक्सप्रमाणेच जो चेंडू सोडून देता येणे शक्य होते, त्याला छेडत आत्मघात करवून घेतला. वॅग्नरचा तो चेंडू वाईड फुलटॉस होता. त्यावर पोपचा फटका चुकला आणि शॉर्ट कव्हरवरील मिशेल सॅन्टनरने हवेत झेपावत झेल पूर्ण केला. नवा चेंडू घेतला गेल्यानंतर वॅग्नरने बटलरची खेळी संपुष्टात आणली. बटलरला 18 चेंडूत एकही धाव घेता आली नाही. वॅग्नरने 44 धावात 5 बळी, असे दमदार पृथक्करण नोंदवले तर सॅन्टनरनेही 53 धावात 3 बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. न्यूझीलंडने पहिल्या डावात 9 बाद 615 धावांचा मोठा डोंगर उभारला, त्यात बीजे वॅटलिंगचा 205 धावांच्या ुपहिल्या द्विशतकी झंझावाताचा आणि सॅन्टनरच्या पहिल्या शतकाचा (126) मोलाचा वाटा राहिला. अर्थात, येथे न्यूझीलंडचा संघ डावाने विजयाच्या उंबरठयावर असतानाच ट्रेंट बोल्ट व कर्णधार केन विल्यम्सनच्या दुखापतीमुळे त्यांच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. ट्रेंट बोल्टला वेदनेमुळे मैदान सोडण्यापूर्वी केवळ एकच षटक टाकता आले तर विजयावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी काही वेळाआधीच कर्णधार केन विल्यम्सनला दुखापतीमुळे वेदना असहय झाल्याने मैदान सोडावे लागले. उभय संघातील दुसरी व शेवटची कसोटी शुक्रवारपासून हॅमिल्टन येथे खेळवली जाणार आहे.