Breaking News

पुरुष हॉकी विश्‍वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे

सलग दुसर्‍यांदा स्पर्धा भरवण्याचा सन्मान, आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेची घोषणा

Hockey Worldcup
लुसाने
भारत सलग दुसर्‍यांदा पुरुष हॉकी विश्‍वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवेल, 2023 ची ही स्पर्धा पुन्हा भारतात होईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने केली. फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार ही स्पर्धा 2023 मध्ये दि. 19 ते 29 जानेवारी या कालावधीत भरवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या या वर्षातील शेवटच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. 2022 महिला विश्‍वचषक स्पर्धेसाठी स्पेन व हॉलंड यांना यावेळी येथे सहयजमान म्हणून घोषित केले गेले. ही स्पर्धा दि. 1 ते 22 जुलै या कालावधीत होईल. यजमान देशातील कोणत्या शहरात स्पर्धेतील सामने होतील, याचा तपशील नंतर जाहीर केला जाणार आहे. 2023 ची स्पर्धा येथे होत असल्याने यासह भारत चारवेळा पुरुष हॉकी विश्‍वचषक स्पर्धा भरवणारा पहिलाच देश ठरणार आहे. यापूर्वी 1982 (मुंबई), 2010 (नवी दिल्ली), 2018 (भुवनेश्‍वर) येथे भारताने तीन विश्‍वचषक स्पर्धा भरवल्या आहेत. सर्वाधिक वेळा विश्‍वचषक स्पर्धा भरवण्याच्या निकषावर हॉलंड दुसऱया स्थानी असून ते आजवर तीनवेळा विश्‍वचषक स्पर्धेचे यजमान ठरले आहेत. भारत 2023 मध्ये स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत असून यामुळे त्या वर्षात विश्‍वचषक स्पर्धा भारतात व्हावी, असा हॉकी इंडियाचा मानस होता आणि याच विचाराने त्यांनी यजमानपदाच्या शर्यतीत आपली दावेदारी दाखल केली. या स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारतासह बेल्जियम व मलेशिया हे देश शर्यतीत होते. त्यांच्यावर भारताने मात केल्याचे स्पष्ट झाले. याचबरोबर महिला विश्‍वचषक स्पर्धेसाठी जर्मनी, स्पेन, हॉलंड, मलेशिया व न्यूझीलंड यांनी आपले प्रस्ताव दाखल केले होते. 2023 ची हॉकी विश्‍वचषक स्पर्धाही मागील आवृत्तीप्रमाणेच खेळवली जाणार आहे.
याबाबत आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे सीईओ थिएरी वेल म्हणाले, ‘हॉकीची प्रगती व स्पर्धा यशस्वी करवून दाखवण्याची क्षमता या दोन बाजू आम्ही विचारात घेतल्या आणि त्यानुसार, महिला व पुरुष विश्‍वचषक स्पर्धेसाठी यजमानपद निश्‍चित केले आहेत. वास्तविक, यजमानपदासाठी अनेक उत्तम प्रस्ताव आले आणि यातून अंतिम निर्णय घेणे अर्थातच आव्हानात्मक होते. यजमानपद बहाल केलेल्या देशातील आयोजन समितीच्या सहकार्याने आम्ही या स्पर्धा यशस्वी करुन दाखवू’. भारतीय हॉकीला बडया स्पर्धा भरवण्याचा उत्तम अनुभव असून यामुळे ही जमेची बाजू असेल. विश्‍वचषकाबरोबरच भारताने काही मोठया स्पर्धा भरवल्या असून यात 2014 चॅम्पियन्स चषक, 2016 कनिष्ठ पुरुष विश्‍वचषक, 2017 हॉकी वर्ल्ड लीग फायनल, 2019 पुरुष सिरीज फायनल्स व अलीकडेच संपन्न झालेल्या हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेचा समावेश आहे.

भारताकडून यजमानपदाचे स्वागत
2023 पुरुष हॉकी विश्‍वचषक स्पर्धेचे यजमानपद सोपवले गेले, ही आमच्यासाठी सन्मानाची बाब असून आम्ही त्याचे आनंदाने स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी दिली. हॉकी हा आमचा राष्ट्रीय खेळ आहे आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात हॉकीची विश्‍वचषक स्पर्धा भरवण्याचा सन्मान लाभणे आमच्यासाठी उत्साहवर्धक आहे. यापूर्वी अनेक स्पर्धा यशस्वी केल्याने हॉकी विश्‍वचषक स्पर्धेचे यजमानपद पुन्हा लाभेल, याची आम्हाला खात्री होती, असे ते पुढे म्हणाले.