Breaking News

भव्य कार्यक्रमात ठाकरे सरकारचा आज शपथविधी

देशभरातील मान्यवर राहणार उपस्थित

Uddhav Thakare
मुंबई
राज्यातील सत्तानाटय संपुष्टात आल्यानंतर बुधवारी सर्व आमदारांनी विधीमंडळात शपथ घेतल्यामुळे नवी विधानसभा अस्तित्वात आली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून गुरूवारी शिवतीर्थावर एका भव्य कार्यक्रमात शपथ घेणार आहेत. तर उपमुख्यमंत्री म्हणून, काँगे्रसचे बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादी काँगे्रसचे जयंत पाटील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या शपथविधील देशभरातून विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे.
हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक बनवण्यासाठी शिवाजी पार्क म्हणजेच शिवतिर्थावर जय्यत तयारी सुरू आहे. देशभरातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना या शपथविधीसाठी बोलावलं जाणार असल्याची माहिती आहे. शिवाजी पार्कात तब्बल 70 हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. तर एका मोठ्या व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांसाठी खुर्च्या लावण्यात येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शपथविधीला यावं यासाठीही प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईत शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण आता या नव्या आघाडीत इतर सहभागी पक्षांना कोणती पदे मिळणार हे पाहणे सर्वांसाठी महत्त्वाचे असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रीपदे असणार आहेत. काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. बंडखोरी करून भाजपसोबत सत्ता स्थापन करणार्‍या अजित पवार यांचे नव्या सरकारमध्ये स्थान काय असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अजित पवार यांना मंत्रिपद मिळणार की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. तिन्ही पक्षांनी अजून कोणाला किती मंत्रिपदे मिळणार हे स्पष्ट केलेले नाही. तिन्ही पक्षांमध्ये सध्या याच विषयावरून चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत 56 जागा जिंकणार्‍या शिवसेनेला एकूण 15 मंत्रिपदे आणि मुख्यमंत्रीपद मिळणार आहे. काँग्रेसला 13 मंत्रिपदे आणि विधानसभेचे अध्यक्षपद मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीला नव्या सरकारमध्ये 14 ते 15 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासह एकूण 43 मंत्रिपदे देण्यात येऊ शकतात. शिवसेना स्वतःकडे नगरविकास आणि अर्थ खात्याचे मंत्रिपद ठेवण्यासाठी आग्रही आहे. त्याचबरोबर उद्योग, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि शिक्षण ही सुद्धा मंत्रिपदे स्वतःकडे ठेवण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. महसूल, कृषी, सामाजिक न्याय, गृहनिर्माण आणि ग्राम विकास ही खाती आपल्याला मिळावीत, यासाठी काँग्रेस आग्रही आहे. गृह, जलसिंचन, आदिवासी विकास या खात्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. विधान परिषदेतील अध्यक्षपदासाठीही राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे.
दरम्यान, सहसा सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत नव्या सदस्यांचा शपथविधी होत असतो. पण बुधवारी शपथविधी होत असताना नवे सरकारही अस्तित्त्वात आलेले नाही आणि मुख्यमंत्रीही नाहीत. महाराष्ट्र विधान भवनाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या विधानसभेत पहिल्यांदा मुख्यमंत्री शपथ घेत असतात. त्यानंतर इतर सदस्यांना शपथ दिली जाते. शपथ झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसर्‍या दिवशी विश्‍वासदर्शक ठरावावर मतदानही घेतले जाते. सध्यातरी राज्यात कोणीही मुख्यमंत्री नाही. तरीही शपथविधी सोहळा होतो आहे. याचे कारण अर्थातच सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेला अंतरिम आदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पाच वाजेपर्यंत सदस्यांचा शपथविधी पूर्ण करण्याचे आदेश विधीमंडळाला दिले होते. त्यामुळेच नव्या सदस्यांना शपथ दिली जाते आहे. एकदा सर्व सदस्यांची शपथ पूर्ण झाल्यावर नवी विधानसभा पूर्णपणे कार्यरत होईल. पुढील मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांचे मंत्रिमंडळ तयार होईल. त्यानंतर विधानसभेचे पुन्हा अधिवेशन बोलावले जाईल. त्यामध्येच नव्या सरकारला आपले बहुमत सिद्ध करावे लागेल, असेही राजेंद्र भागवत यांनी स्पष्ट केले.


बंड करण्याचा प्रश्‍नच नाही : अजित पवार
मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो आणि आहे हे याआधीच सांगितले आहे. मला पक्षातून काढले का? त्यामुळं बंड करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. तुम्ही तसे कुठे ऐकले किंवा वाचले का? मी राष्ट्रवादीसोबतच आहे आणि शरद पवार हेच आमचे नेते आहेत, असे अजित पवार यांनी आज स्पष्ट केले. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडल्याचे सांगितले जात होते. मतपरिवर्तन झाल्यानंतर त्यांनी काल दुपारी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काल रात्री शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अजित पवार यांच्या भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण पूर्ण ढवळून निघाले होते.


अजितदादांवर योग्यवेळी बोलेन ः फडणवीस
ऐनवेळी अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अखेर मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. ज्यांच्याविरोधात भ्रष्ट्राचाराचे रान उठवले होते. त्यांच्याशी आघाडी केल्यामुळे राज्यातून भाजपवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्‍न विचारला असता त्यांनी योग्यवेळी योग्य उत्तर देईन, काळजी करु नका, असे म्हटले. नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर विधानभवना बाहेर पडलेल्या फडणवीसांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गाठले. अजित पवारांचा पाठिंबा घेणे ही भाजपची चूक होती का?, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी योग्यवेळी याचे उत्तर देऊ असे म्हटले.


आमचे यान सुरक्षित उतरले : संजय राऊत
अघोरी प्रयत्न करुनही भाजपला आपला मुख्यमंत्री महाराष्ट्रावर लादता आलेला नाही. देशातील परिवर्तनाची नांदी महाराष्ट्रातून सुरु झाली आहे, असे सांगताना संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आमचे सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर व्यवस्थित उतरले आहे. आता ते दिल्लीतही उतरेल त्यावेळी कुणाला आश्‍चर्य वाटायला नको, असा विश्‍वासही व्यक्त केला. संजय राऊत हे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ज्यावेळी मी शिवसेनेचे सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरेल असे म्हटले होते. त्यावेळी माझी थट्टा करण्यात आली. पण हे सूर्ययान आता व्यवस्थित उतरले आहे. भविष्यात दिल्लीतही ते उतरल्यानंतर आश्‍चर्य वाटायला नको असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.