Breaking News

मोकाट जनावरांमुळे राशीन ग्रामस्थ त्रस्त

नागरिकांच्या तक्रारींकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, वाहनचालकांवर कसरत करण्याची वेळ, भाजीविक्रेते वैतागले

cows
कर्जत/प्रतिनिधी
मोकाट जनावरांच्या त्रासाने राशीन ग्रामस्थ, प्रवासी तसेच बाजारकरू त्रस्त झाले आहेत. मुख्य रस्ते तसेच राज्यमार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. मोकाट जनावरांच्या अडथळ्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायतीकडून मोकाट जनावरांच्या प्रश्‍नावर कसलाच ठोस निर्णय घेतला जात नाही. ग्रामस्थांची ओरड होऊनही त्याची दखल घेतली जात नाही.
या प्रश्‍नावर आंदोलनेही झाली. परंतु तात्पुरत्या उपाययोजना करून या प्रश्‍नाला बगल देण्यात येते. यामुळे ग्रामस्थ प्रशासनापुढे हतबल झाले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना त्रास होत आहे.
जनावरे शहरात ठिकठिकाणी ठिय्या देत आहेत. त्यांच्या अडथळ्यामुळे अनेकदा वाहतुकीचीही कोंडी होते. त्याचा वाहनचालकांसह बाजारपेठेतील व्यापार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. राशीन शहरात अनेक वर्षांपासून मोकाट जनावरांचा त्रास सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी युवक क्रांती दलाच्या वतीने या प्रश्‍नावर आंदोलन करण्यात आले. त्याची दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने जुजबी कारवाई केली. मोकाट जनावरांच्या मालकांना फक्त नोटीस बजावण्यात आल्या. कारवाईच्या भीतीने काही दिवस मालकांनी जनावरांवर नियंत्रण ठेवले. परंतु नंतर जैसे थे परिस्थिती झाली.
राशीन येथील नागरिकांच्या या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामपंचायतकडून जनावरांसाठी कोंडवाड्याची व्यवस्था करणे, जनावरांची गणना करून मालकांना नोटिसा देणे, त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाची मदत घेणे, अशा अंमलबजावणीची गरज आहे. परंतु त्याची कार्यवाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून केल्याचे दिसत नाही.
सार्वजनिक ठिकाणी गाय, बैल तसेच वासरांचाही मोठा वावर आहे. ग्रामपंचायतीकडे याबाबत तक्रारी होतात परंतु मोकाट जनावरांवर ठोस कारवाई केली जात नाही. मंगळवारी आठवडे बाजारात घुसून विक्रीला मांडलेल्या भाज्या जनावरे फस्त करतात.त्याचा मोठा भुर्दंड विक्रेत्यांना बसत आहे. बाजार करण्यासाठी आलेल्या महिलांना जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे. वळूच्या धडकेने जखमी होण्याच्या घटनाही राशीन येथे घडत आहेत.
महात्मा फुले चौक, भिगवण, करमाळा तसेच सिद्धटेक रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथे मोकाट जनावरांचा कळप असतो. त्यामुळे चालकांना मोठी कसरत करून वाट काढावी लागते. ग्रामपंचायत प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी, ग्रामस्थ तसेच प्रवाशांकडून होत आहे.


राशीन येथील मोकाट जनावरे शेतकर्‍यांना पाळण्यासाठी द्यावीत. ते शक्य नसल्यास ग्रामपंचायतने जनावरांसाठी स्वतंत्र गोठा बांधून त्यांचे संगोपन करावे. त्यातून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीला लागेल.
- दिलीप पवार, प्रवासी, जळकेवाडी.