Breaking News

दिव्यात पुन्हा कचर्‍याचा धूर

कचराभूमीवरील आग विझवण्यासाठी दिवसभर प्रयत्न

Garbage burning
ठाणे
दिवा कचराभूमीला सातत्याने लागणार्‍या आगीच्या धुरामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले असतानाच, मंगळवारी सकाळी दिवा कचराभूमीला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, दुपापर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती. आगीचा धूर परिसरात पसरल्याने त्याचा स्थानिकांना त्रास झाला असून यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच या आगीमुळे स्थानिकांच्या संतापामध्ये पुन्हा भर पडली.
दिव्यातील कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करून तेथे उद्यान उभारण्याचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव गेल्याच आठवड्यात ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात आला होता. मात्र सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यात त्रुटी असल्याचे सांगत नव्याने प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला होता. असे असातानाच मंगळवारी सकाळी कचराभूमीवर आग लागली. या आगीने काही काळात रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर आग विझविण्याचे काम तात्काळ सुरू केले. दोन पाणी टँकरच्या साहाय्याने ही आग विझविण्याचे काम सुरू होते. मात्र, दुपापर्यंत आग विझविण्यात दोन्ही विभागांना यश आले नव्हते. या आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. त्याचा स्थानिकांना त्रास झाल्याचे दिसून आले.
दिवा परिसरातील कचराभूमीचे क्षेत्रफळ मोठे आहे. या ठिकाणी आग लागली तर ती विझविण्यात अडचणी येतात. या ठिकाणी पूर्वी पाण्याचा टँकर ठेवला जात होता आणि त्याद्वारे आग विझविली जात होती. मात्र, यंदा उशिरापर्यंत पाऊस सुरू असल्याने त्या ठिकाणी टँकर ठेवण्यात आले नव्हते. तसेच कचर्‍यावर पाण्याचा मारा केला जातो. मात्र, सध्या कडक ऊन पडत असल्याने पाणी लगेच सुकते. त्यामुळे कचर्‍याला लागलेली आग विझविल्यानंतर ती पुन्हा लागू नये यासाठी जेसीबीच्या साहाय्याने कचरा वर खाली करून त्यावर पाण्याचा मारा केला जातो. पंरतु कचर्‍याचे ढिग भुसभुशीत असल्यामुळे त्या ठिकाणी जेसीबी अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी अशाच प्रकारे आग विझविण्यात अडचण येत होती, अशी माहिती महापालिकेतील एका अधिकार्‍याने दिली.

‘आता हा त्रास नको’
ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 800 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. महापालिकेच्या मालकीची कचराभूमी नसल्याने महापालिका दिव्यातील खासगी जागांवर कचरा टाकते. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो. आतापर्यंत 23 लाख मेट्रिक टन कचरा टाकण्यात आला असून त्या ठिकाणी कचर्‍याचे डोंगर उभे राहिले आहेत. कचर्‍याची दुर्गंधी परिसरात पसरत असून या दुर्गंधीमुळे स्थानिक हैराण झाले आहेत. तसेच कचराभूमीला सातत्याने आग लागण्याची घटना घडत असून या आगीच्या धुरामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याशिवाय, कचराभूमी शेजारील खाडीचे पात्र असून त्या ठिकाणीही कचराभूमीतील कचरा पडत आहे. त्यामुळे खाडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या सर्वाच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिकांकडून कचराभूमी बंद करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे.