Breaking News

सेवा समान तरीही वेतनात तफावत

महापालिका शाळेतील ठोक मानधनावरील शिक्षकांमध्ये असंतोष

नवी मुंबई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागांत शिकवणार्‍या ठोक मानधनावरील शिक्षकांना सुट्टीतील पगार मिळत नसल्याने त्यांची फरफट होत आहे. सेवेत कायम असलेल्या शिक्षकांएवढेच हे शिक्षक काम करत असताना वेतनात अशी तफावत का, असा प्रश्‍न या शिक्षकांनी उपस्थित केला असून त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संपूर्ण राज्यभरासह, मुंबईसह विविध शहरांतील महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र, नवी मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढतच आहे. पालिका शिक्षण विभागाअंतर्गत 53 प्राथमिक शाळा व 116 बालवाडी वर्ग कार्यरत आहेत, तर पालिकेच्या 19 माध्यमिक शाळांमधून ठोक मानधनावर 43, तर शिक्षणसेवक म्हणून 31 शिक्षक कार्यरत आहेत व उर्वरित शिक्षक कायमस्वरूपी आहेत. तसेच दुसरीकडे प्राथमिक विभागातील अनेक शिक्षक ठोक मानधनावर काम करत आहेत. शाळेच्या शालान्त परीक्षेचा निकालही खासगी शाळांच्या तुलनेत चांगला लागत असून यामध्ये या शाळांमध्ये शिकवणार्‍या कायम व ठोक मानधनावरील शिक्षकांचे व पालिका व्यवस्थापनाचे हे यश आहे, असे सांगितले जाते. परंतु माध्यमिक शाळांमध्ये सेवेत कायम असलेल्या   शिक्षकांच्या मानाने ठोक मानधनावर असलेल्या शिक्षकांना काही पटीत कमी वेतन मिळत आहे. दोन्हीही शिक्षकांचे काम समान असल्याने असा दुजाभाव का, असा प्रश्‍न उपस्थित करून ठोक मानधनावर काम करणार्‍या शिक्षकांनाही कायम शिक्षकांप्रमाणेच वेतन आणि वाढ मिळावी, अशी मागणी  होत आहे.  ठोक मानधनावर काम करणार्‍या शिक्षकांना महिन्यातून एक सुट्टी घेता येते. त्यापेक्षा अधिक सुट्टी घेतल्यास त्या दिवसाचे मानधनही कापले जाते. तसेच दिवाळीच्या सुट्टीप्रमाणे उन्हाळ्यातील सुट्टीचे मानधनही त्यांना दिले जात नाही. मात्र हा नियम कायम शिक्षकांना लागू नाही. शाळेचा निकाल चांगला लागावा यासाठी सर्वच शिक्षक मेहनत घेत असताना वेतनातील तफावतेमुळे शिक्षकांमध्ये असंतोष आहे. पालिकेत कायम शिक्षकांची मोठया प्रमाणात गरज असताना पालिकेच्या व शासनाच्या उदासीनतेमुळे या शिक्षकांना पालिकेत सामावून घेतले जात नाही. त्यामुळे नोकरीची शाश्‍वती नाही. आर्थिक बिकट परिस्थितीमुळे दिवाळीही नीट साजरी करता येत नसल्याची खंतही शिक्षकांची आहे.  शिक्षक देशाची भावी पिढी घडवण्याचे काम करतात  त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला आणि नोकरीची शाश्‍वती दिली पाहिजे, अशी मागणी  शिक्षकांची आहे. याबाबत पालिका आयुक्तांशी संपर्क होऊ शकला नाही.
इतर शिक्षकांना सुट्टी असते. त्यांना पूर्ण पगार, परंतु ठोक मानधनावर म्हणून मानधनाविना हे दु:खदायक आहे. शिक्षकांना योग्य व सर्वाना समान पगार दिला गेला पाहिजे. अनेक वर्षे काम करणार्‍या शिक्षकांना पालिकेत कायम करून घेण्याबाबत प्रशासनाने प्रस्ताव आणला तर सर्वच लोकप्रतिनिधी त्याला मान्यता देतील. शाळांमधील ठोक मानधनावरील साफसफाई कर्मचार्‍यांचीही तीच अवस्था होत आहे. - सुधाकर सोनावणे, माजी महापौर
आम्हीही शिक्षक असून पालिकेच्या प्राथमिक विभागात शिक्षणाचेच काम करतो. सध्या ठोक मानधनावर अनेक प्राथमिक शिक्षक काम करत असून आम्हाला सुट्टीतील मानधन मिळत नाही याची खंत आहे. - सिद्धराम शिलवंत, ठोक मानधनावरील प्राथमिक शिक्षक
ठोक मानधनावरील शिक्षकांनाही इतर शिक्षकांप्रमाणे सुट्टीतील मानधन दिले गेले पाहिजे. त्यांना कायम करण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करणार आहे. - जयवंत सुतार, महापौर