Breaking News

देवेंद्र फडणवीस मावळते मुख्यमंत्री, शिवसेनेचा टोला

मुंबई
 शिवसेनेने राज्यातील सत्ता स्थापनेवरून भाजप आणि त्याचबरोबर केंद्र सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. दिल्ली गढूळ झाल्याची टीका करत देवेंद्र फडणवीस हे मावळते मुख्यमंत्री असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे.
सत्तास्थापनेचा घोळ घालायचा आणि परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. नवे राज्य मोकळ्या वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ‘कौल’ दिला आहे. दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल. त्यांच्या पावलावरच राज्याची पुढची दिशा ठरेल. सध्या आम्हाला चिंता आहे ती ओल्या दुष्काळाची आणि महागलेल्या भाजीपाल्याची, अशी चिंता व्यक्त करत शिवसेनेने भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे.
भाजपचे विधिमंडळ पक्षनेते आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहांना भेटले. महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार व आपण स्वतः मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, असं ते पत्रकारांना म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या शब्दांमुळे राज्यातील गुंता सुटेल व एक सरकार मिळेल असे समजायला हकरत नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांनी शहांची भेट घेऊन सरकार स्थापण्याचे भाष्य केले आहे. म्हणजे नक्कीच त्यांनी जुळवाजुळव केली असेल आणि बहुमताचा वस्त्रगाळ करून जमवला असेल, असा घणाघात भाजपवर करण्यात आला. जेव्ह अंत:करण भरून येते तेव्हा आपल्या मनातील भावना आणि कल्पना व्यक्त करावयास शब्द अपुरे पडतात असे काहीसे मुख्यमंत्र्यांचे झाल्याचे दिसतेय, अशी खोचक टीकाही करण्यात आलीय.
बहुमताचा आकडा गोळा करण्यात पुढचे चारेक दिवस जातील. पण ती कसरत म्हणजे दिल्लीच्या गढूळ धुक्यात विमान उतरवण्यासारखे आहे. गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी एका बाजूला, तर दुसरीकडे शरद पवार यांनी सोनिया गांधी भेट घेतल्याने नक्की काय जुळवाजुळव करतात ते पाहणं रंजक ठरेल, असे काहीसे नव्या समीकरणांचे संकेत शिवसेनेने दिलेत.