Breaking News

अयोध्या निकाल कोर्टाचा असेल, सरकारचा नाही: राऊत

मुंबई
अयोध्येत बाबरी मशीद पडली आणि बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतरत देशात हिंदुत्वाची लाट आली आणि त्याच लाटेवर आज अनेकजण उभे आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याचे नाव न घेता लगावला. बाबरी मशीद पडली तेव्हा काही लोक पळून गेले होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे हेच पुढे आले होते. हे लक्षात घेता अयोध्येत भविष्यात मंदिर उभारणीत शिवसेनेचे मोठे योगदान आहे असे संजय राऊत म्हणाले. अयोध्या प्रकरणावरील हा ऐतिहासिक निकाल कोर्टाचा असेल, सरकारचा नाही असेही राऊत म्हणाले.
बाबरी मशिद रिकाम्या जागी बांधली नव्हती - कोर्ट
राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाल्यानंतर दररोज पत्रकार परिषदांचा धडाका लावणार्‍या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आजही पत्रकार परिषद घेतली. मात्र, राऊत यांनी आज घेतलेली पत्रकार परिषद ही सत्तेबाबतची नव्हती, तर ती होती रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादाबाबतच्या खटल्याच्या निकालाबाबत. मात्र, दररोज भारतीय जनता पक्षावर टीकेचे बाण चालवणार्‍या राऊत यांनी अयोध्या खटल्याच्या निकालाच्या मुद्द्यावरूनही भारतीय जनता पक्ष आणि केद्र सरकारलाच आपल्या टीकेचे लक्ष्य केले.

अयोध्या: निकालानंतरही उरतात दोन पर्याय
या वेळी बोलताना त्यांनी राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर त्याचे श्रेय भारतीय जनता पक्ष किंवा केंद्र सरकारने घेऊ नये,असे अप्रत्यक्षपणे सांगितले. मात्र, राम मंदिर उभारणी झालीच तर त्यांचे श्रेय शिवसेना या पक्षाला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.