Breaking News

अजित पवार यांच्या क्लीन चीटवरून खडसे यांचा भाजपला घरचा आहेर

मुंबई
अजित पवार उपमुख्यमंत्री होणे त्यांनी मंत्रालयात पाऊल टाकणे आणि बातमी येणे की सिंचन घोटाळ्यातील नऊ प्रकरणांची फाईल बंद, हा निर्णय जाणीवपूर्वक घेतलेला नाही, अशी शंका का घेता? हा योगायोग आहे, असे भाजपचे नेते एकनाथ खडसे म्हणाले. ते जळगावमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
भाजप विरोधी पक्षात असताना आणि सत्तेत असतानाही स्वतः देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना जेलची चक्की पिसवण्याची भाषा केली होती. आता त्यांच्याच मदतीने फडणवीसांनी राज्यात सरकार स्थापन केले आहे. यावरून सोशल मीडियावर मेमेजचा वर्षाव होत आहे. या पार्श्‍वभूमीवर खडसे यांनी पक्षाला पुन्हा एकदा घरचा अहेर दिला आहे. ‘देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन पदभार स्वीकारला. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचा पहिला दिवस. त्यांनी चार्ज घेणं, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होणं, त्यांनी मंत्रालयात पाऊल टाकणं आणि बातमी येणं की सिंचन घोटाळ्यातील नऊ प्रकरणांची फाईल बंद, हा निर्णय जाणीवपूर्वक घेतलेला नाही, अशी शंका का घेता? हा योगायोग आहे.’ अशी उपहासात्मक टीका एकनाथ खडसे यांनी केली. ‘ती फाईल बंद आधीच करायची होती. आता याला योगायोग म्हणायचा की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणून ती बंद करण्यात आली, असं सांगायचं? की अजितदादा सरकारमध्ये आले म्हणून बंद केली, असं सांगायचं? ही जी शंका आहे जनसामान्यांमध्ये, त्यामुळे साहजिकच त्यांचा राजकारणावरचा विश्‍वास उडाला आहे. अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली. आपल्याला गेल्या महिनाभरात हजारो फोन आले. शेकडो लोक भेटून गेले. त्यात अनेक जण आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असतात की, नाथाभाऊ, आपल्यासारखी सिनिअर माणसं जर आता राजकारणात असती, तर महाराष्ट्रात हे चित्र नसतं. कदाचित युती तुटली नसती, सध्याचं संकट आलं नसतं आणि चित्र वेगळं असतं, वेगळी दिशा समाजाला मिळाली असती.’ अशी खंतही खडसेंनी बोलून दाखवली. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या 2000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर पक्षाशी प्रामाणिक राहिलेल्या, पक्षवाढीसाठी जीवतोड कष्ट करणार्‍या खडसेंचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे सगळे प्रयत्न महाराष्ट्राने पाहिले आहेत. 23 नोव्हेंबरची सकाळ उजाडली तेव्हा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेली दिसले. हे चित्र महाराष्ट्राला आश्‍चर्याचा धक्का देणारे ठरले. तर हे का कसे घडले या चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांच्यावरील आरोपाची सिंचन घोटाळ्याची फाईल तात्पुरती बंद करण्यात आल्याच्या बातम्या येऊ लागल्या. तसे सर्वांनीच डोळे विस्फारले. मात्र या सर्व बाबींवर भाष्य करताना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आश्‍चर्य वगैरे व्यक्त न करता उलट कानपिचक्या घेतल्या.