Breaking News

शेतकर्‍यांना आकस्मित निधीतून मदत : मुनगंटीवार

मुंबई
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारची वाट न पाहता राज्याच्या आकस्मित निधीतून मदत करणार असल्याचे स्पष्ट संकेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिले आहेत. मुंबईत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पालमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
यावेळी सर्व पालकमंत्री त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्याचा आढावा घेऊन आले होते. भाजपच्या मंत्र्यांसोबतच एकनाथ शिंदे, रामदास कदम, दिवाकर रावते, दीपक केसरकर आणि दादा भुसे या शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती. या बैठकीनंतर मुनगंटीवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटेल आणि गोड बातमी मिळेल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 70 लाख हेक्टर शेतजमीनीचे नुकसान झाले असून शेतकर्‍यांना लवकरच मदत दिली जाईल, असेही ते म्हणाले. मुनगंटीवार यावेळी बोलतांना म्हणाले की, या बैठकीत अवकाळी पावसामळे जे नुकसान झालंय त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन नुकसानीचा अंदाज घेण्याचे आदेश दिले.राज्यातील सर्व 34 जिल्ह्यांतील 70 लाख हेक्टरवर अवकाळी पावसाने नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यांपैकी 19 लाख हेक्टवर कापूस, 18 लक्ष हेक्टरवर सोयाबीन व इतर नुकसानीचा अंदाज समोर आहे. आत्तापर्यंत 60 लाख हेक्टरचे पंचनामे झाले आहेत. त्याचबरोबर पीक विम्याचे पैसे मिळताना शेतकर्‍यांना अडचणी होऊ नये यासाठी या बैठकीत चर्चा झाली. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आकस्मित निधीने मदत करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आल्याचे यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले. अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकरी व शेतमजुरांना 2 त 3 रूपये किलो दराने धान्य पुरवठा करण्याला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे जी उभी पीकं जमीनदोस्त झाली अशा शेतीच्या सफाईसाठी मनरेगाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांकडून बँकांनी सक्तीची कर्जवसूली करु नये असे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर चारा निर्मितीच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. खरीपाच्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याने रब्बीचे पीक मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे यावरही लक्ष ठेवण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या बैठकीत राज्यात सत्ता स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. दरम्यान, राज्यात सत्तेचा रस्ता कसा असेल यासाठी काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली नव्हती, तर गुजरातच्या रस्त्यांसंदर्भात ही भेट होती, असे मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजपचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार
राज्यात महायुतीचेच सरकार येणार असे सांगतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ गुरुवारी राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार असल्याचे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मुनगंटीवार यांनी राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीची माहिती देणार असल्याचे सांगितल्याने भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार की नाही? याचा सस्पेन्स वाढला आहे. राज्यपालांना भेटल्यानंतर उद्याच सर्व गोष्टींचा उलगडा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुका होऊन 13 दिवस उलटल्यानंतर उद्या पहिल्यांदाच भाजपचे नेते राज्यपालांना भेटणार असल्याने त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.