Breaking News

गिरीष बापट युतीतील ’शकुनीमामा’, शिवसेनेच्या माजी खासदाराने केले वादग्रस्त वक्तव्य

Bapat Adhalrao
चाकण
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेने युती धर्म पाळत एकजुटीने काम केले. तरी देखील माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, सध्या विधानसभा निवडणुकीत युती धर्माचे पालन झाले नाही, त्यामुळे शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला, असे सांगत शिवाजी आढळराव पाटील यांनी पराभवाचे खापर भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यावर फोडले आहे. गिरीश बापट हे युतीतील ’शकुनीमामा’ असल्याची घणाघाती टीका शिवाजी आढळराव पाटलांनी केली आहे.

शिवाजी आढळराव पाटील यांनी चाकण येथे झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात गिरीष बापटांना टार्गेट केले. ते म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांपासून शिरूर लोकसभा मतदार संघातील जुन्नर-शिरूर-खेड या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला होता. मात्र, यावेळी शिवसेनेला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. मात्र, अपयशाचे खापर माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी गिरीष बापटांवर फोडले आहे. गिरीष बापट यांच्यामुळे युतीधर्म पाळला गेला नाही. त्यामुळे शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हे गिरीश बापट म्हणजे पुणे जिल्ह्यासाठी ’शकुनीमामा’ आहेत, अशा शब्दात आढळराव पाटलांनी शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात टोला लगावला.

दरम्यान, शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे युतीत असलेले भाजप-शिवसेनेचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू आक्रमकपणे लावून धरली असताना मात्र, भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेशी चर्चेच्या प्रतीक्षेत असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेची घाई नाही. चर्चेची दारं शिवसेनेकडून बंद असल्याने भाजप प्रतिसादासाठी शेवटच्या क्षणापर्यंत ’वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे.

दुसरीकडे, राज्यात राष्ट्रपती लागवट लागू होण्याच्या दिशेने सर्व पक्षीयांची वाटचाल सुरू आहे. येत्या 8 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ संपून नवी विधानसभा अस्तित्वात येईल. सत्तास्थापनेबाबत भाजप-शिवसेनेत तोडगा निघाला नाही तर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास भाजप श्रेष्ठी निवांत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.