Breaking News

गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी जनजागृती

अहमदनगर/प्रतिनिधी

 कृषी विभागाद्वारे  कापसावर पडणाऱ्या गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी जनजागृती सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कापूस पिकात फेरोमन सापळे लावण्यासह विशिष्ट मात्रेत कीटकनाशक फवारणीचेही आवाहन केले गेले आहे.

 याबाबत कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले की, सप्टेंबरच्या शेवटच्या व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी २९ ते ३० सेल्सियस तापमान असताना गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कापसावर दिसतो. परंतु, यावर्षी पावसाचा कालावधी वाढल्याने कापसावरील गुलाबी बोंडअळीचे पतंग जमिनीत असलेल्या कोषावस्थेमधून आता बाहेर येत आहेत. हीच स्थिती सर्व कापूस पिकामध्ये आढळून येण्याची शक्यता आहे. या किडीचा प्रादुर्भाव ज्या कपाशीला हिरवी बोंडे व पात्या आहेत, अशा ठिकाणी दिसून येण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी बोंडअळीचे पतंग दिसल्यास कापूस पिकात फेरोमन सापळे लावण्यासह विशिष्ट मात्रेत कीटकनाशक फवारणी करावी, कृषी विभागातील तज्ज्ञांचा सल्ला त्यासाठी घ्यावा तसेच कापूस पिकाची पूर्ण वेचणी झाल्यानंतर (एक ते दीड महिन्यामध्ये) कापसावर असलेली बोंडांची संख्या व अपेक्षित उत्पन्न यांचा अंदाज घेऊनच कीड व्यवस्थापनाची उपाययोजना करण्याचे आवाहन केले गेले आहे.

 सध्याच्या कापूस पिकाच्या वाढलेल्या हंगामामध्ये सरसकट सर्व शेतकऱ्यांनी कीड व्यवस्थापन उपाययोजना करू नये, डिसेंबरअखेर कापूस पीक पूर्णत: काढून टाकावे तसेच कापूस फरदड घेण्याचा मोह टाळावा. त्यामुळे किडीचे जीवनचक्र खंडित होऊन पुढील खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रार्दुभाव होणार नाही, असे जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले आहे.