Breaking News

डहाणूतील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रामुळे प्रदूषण?

पालघर
डहाणूतील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पामुळे डहाणू खाडीच्या सागरी पाण्याचे गेल्या काही महिन्यांपासून बेसुमार प्रदूषण वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळे येथील मत्स्यव्यवसाय कायमचा नष्ट होण्याची भीती पर्यावरण अभ्यासक व मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.
डहाणू खाडीकिनार्‍याच्या मुखाशी औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प असून येथे कोळशापासून वीजनिर्मिती केली जाते. सुमारे 500 मेगावॅट वीजनिर्मितीक्षमतेचा हा प्रकल्प आहे. सुरुवातीला हा प्रकल्प बीएसईएस या कंपनीच्या नावाने कार्यान्वित करण्यात आला. हे केंद्र डहाणू थर्मल पॉवर स्टेशन (डीटीपीएस) या नावानेही ओळखले जाते. त्यानंतर रिलायन्स एनर्जीने हा प्रकल्प घेतला होता. सध्या अदानी कंपनीकडे त्याची मालकी आहे. मुंबई महानगरला वीजपुरवठा करणारा हा
डहाणू येथील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प कोळशावर आधारित असून या प्रकल्पाला वीजनिर्मितीसाठी कोळसा विभागामार्फत कोळसा पुरवठा केला जातो. देशांतर्गत कोळसा रेल्वेमार्गे करण्यात येतो. तर, परदेशातूनही आवश्यकतेनुसार कोळशाची आयात मोठ्या प्रमाणावर केली जाते. परदेशातील कोळसा अरबी समुद्रामार्गे आयात केला जातो. साधारणपणे एका मोठ्या जहाजात 50 ते 55 हजार टन कोळसा आणला जातो.
यासाठी ज्या जहाजातून कोळसा येतो, ते जहाज खोल समुद्रात थांबवून नंतर बार्जद्वारे डहाणू खाडीतून वीजनिर्मिती केंद्रापर्यंत कोळसा आणला जातो. याच वेळी समुद्राच्या पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. बार्जवर कोळशाची भुकटी व जहाजातून सोडले जाणारे काळपट तेल, डिझेल यांमुळे खाडीचे पाणी बेसुमार प्रदूषित होते. परिणामी खाडीपट्ट्यातील मासेमारी कमी होत आहे. या प्रदूषणामुळे तिवर क्षेत्रात मासांची पैदास झपाट्याने घटली आहे. तसेच, पाण्यावर काळपट तेलाचा तवंग साचल्याने समुद्रातील माशांचे खाद्य असलेल्या वनस्पतींची वाढ होत नाही. सागरी जैविक अन्नसाखळीवरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे या भागातील मासेमारी पूर्णतः नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
खाजणाच्या जागेत हा प्रकल्प उभा असून प्रकल्प स्थापनेपासूनच पर्यावरणवाद्यांनी त्यास विरोध केला होता. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा र्‍हास होण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली होती. मात्र, तरीही हा प्रकल्प सुमारे 25 वर्षांपासून सुरू असून येथून मुंबई महानगराला वीजपुरवठा केला जात आहे. यामध्ये वीजनिर्मितीसाठी कोळशाचा वापर करण्यात येत असल्याने राख व धुरामुळे प्रदूषण होत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितले आहे. हरित लवाद प्राधिकरण, पश्‍चिम घाट संरक्षण मंडळ, पर्यावरण संरक्षण, इत्यादी संस्थांच्या निकषानुसार हा विभाग हरित पट्ट्यात मोडतो.
डहाणू खाडीतून वीजनिर्मिती केंद्रात कोळशाची आवक समुद्रमार्गे जहाजातून होते. सुमारे 50 ते 55 हजार टन कोळसा घेऊन आलेल्या जहाजातून बार्ज होड्यांचा वापर करून कोळसा वीजनिर्मिती होते. त्यावेळी कोळसा, राख, डिझेल, चिकट इंधनसदृश्य रसायन, वंगण यांमुळे पाण्यावर तेलाचा तवंग पसरतो. किनार्‍यावर काळपट डांबरसारखे थर पसरल्याने मच्छिमारांना बोटी लावणे, किनार्‍यावर चालण्यासाठी अडचणी येतात. मच्छिमारांचे जाळे, साहित्य या डांबरामुळे निरुपयोगी ठरतात. सागरी पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने मासेमारी व्यवसाय करणे कायमस्वरूपी बंद करण्याची वेळ मच्छिमारांवर आली आहे.