Breaking News

काळदरा ओढ्यातील खडकाच्या भेगांची पाहणी


संगमनेर/प्रतिनिधी

 संगमनेर तालुक्यातील घारगावच्या करवंदवाडी येथील काळदरा ओढयातील खडकाला भेगा पडून ओढयातील पाणीही अचानक आटले होते. परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. काल (बुधवार) नाशिक येथील मेरी संस्थेच्या अधिकारी चारुलता चौधरी यांनी परिसरातील भेगा पडलेल्या खडकाची पाहणी केली.

  घारगाव व बोरबन दोन्ही गावांपासून काही अंतरावर असलेल्या करवंदवाडी याठिकाणी डोंगराच्या कुशीतून काळदरा परिसरात काही दिवसांपूर्वी जोरदार धक्के बसले होते. त्यानंतर काळदरा ओढ्यात खडकाला मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. तहसीलदार अमोल निकम यांनी याठिकाणी पाहणी केली होती. याबबत अहवालही नाशिक मेरी संस्था व नगरच्या भूजल संरक्षण विभागाला पाठवला होता. बुधवारी दुपारी नाशिक मेरी संस्थेच्या चारुलता चौधरी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी चारुलता म्हणाल्या की, भूकंपाची कुठल्याही प्रकारची नोंद भूमापक यंत्रावर झालेली नाही. डोंगरांना गेलेले तडे भुकंपाने गेले नसून हे नैसर्गिक तडे आहेत. या तडयांचे भूवैज्ञानिक संस्था यांच्याकडून निरीक्षण करण्यात येईल. त्यानंतर मग नक्की तडे कशाने गेले हे समजेल परंतु नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी बोरबन गावचे सरपंच संदेश गाडेकर, घारगावचे सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर, तलाठी साईनाथ ढवळे, कोतवाल शशी खोंड, पोपट मधे, रावसाहेब मेंगाळ, रामभाऊ भले, प्रतीक मधे यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.