Breaking News

पाणलोट प्रकल्पाने देवगावचा कायापालट – प्रा. वामन


अहमदनगर/प्रतिनिधी

 नवजीवन प्रतिष्ठान संस्थेच्या समन्वयाने नाबार्ड बँक व कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगर तालुक्यातील देवगाव येथे एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प राबविला जातो. पाणलोट प्रकल्पाने देवगावचा कायापालट झाला आहे असे प्रतिपादन प्रा. वामन यांनी केले.

 या प्रकल्पाचे सातत्याने सनियंत्रण होत असते. त्यानिमित्ताने झालेल्या सभेत प्रा.वामन बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्ष विठ्ठलराव वामन होते. यावेळी सेंद्रिय शेतीतज्ञ प्रशांत चितळे, कमिन्सचे अभिषेक दुबे, अंजली मालुसरे, संयुक्त महिला समितीच्या रंजना वामन, नवजीवनचे राजेंद्र पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 प्रा. वामन पुढे म्हणाले, गेल्या १ वर्षापासून नाबार्ड व कमिन्समार्फत आपल्या गावात पाणलोट प्रकल्प राबविला जातो. त्यानुषंगाने गावातील प्रत्येक कुटुंबास निर्धूर चूल, सेंद्रिय शेतीसाठी ३० देशी गायींचे वाटप, रस्त्याच्या दुतर्फा व गायरानात वृक्षलागवड, डोंगरउतारावर सी.सी.टी. चरखोदाई, बांधबंदिस्ती, फळबाग लागवड, चेकडॅम मधील व पाझरतलावातील गाळ काढणे, डिजिटल स्कूल प्रकल्प इत्यादी विकासाची कामे केलेली आहेत. त्यामुळे देवगावची प्रगती सुरु झाली असून ग्रामस्थांनी या योजनेसाठी तन, मन, धन अर्पण करून सहभागी व्हावे. भविष्यात आपले गाव तालुक्यातील सर्वात सुजलाम सुफलाम गाव होईल.

 यावेळी नाबार्डचे अहमदनगर जिल्ह्याचे व्यवस्थापक शिलकुमार जगताप म्हणाले कि, बचतगटाने पंचसूत्री कार्यक्रमाचा अवलंब करावा. नियमित बचत करावी व नाबार्डच्या ग्रामीण भागासाठी असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा. प्रास्ताविक महेंद्र वामन यांनी तर आभार प्रदर्शन शिवाजी शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेजर सोपान वामन, बजरंग वामन, कृष्णा वामन, सचिन वामन, महेंद्र वामन, श्रद्धा वामन, सुनीता वामन यांनी विशेष परिश्रम घेतले.