Breaking News

’तरुण भारत’मधून संजय राऊतांवर पुन्हा खरमरीत टीका

मुंबई
तरुण भारत वृत्तपत्रानं आज पुन्हा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका केल आहे. अधू दृष्टीचा असं संबोधन करत नाव न घेता संजय राऊतांवर टीका करण्यात आली आहे. तर धृतराष्ट्राच्या मागे फरफटत न जाता आपल्या उत्तरदायित्त्वाचे निर्वहन अधिक महत्त्वाचे आहे आणि असलेही पाहिजे असा सल्लाही उद्धव ठाकरेंना देण्यात आला आहे.

अनेक दरबारींमुळे राज्यात समस्या निर्माण होतात. पण, राजाला हस्तक्षेप करावाच लागतो. दरबारी राज्य चालवित असेल तर राजाच्या क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होतं आणि ते शिवसेना पक्षप्रमुख, उद्धवजींच्या बाबतीत झालेले शिवसैनिकांना कदापिही आवडणार नाही. अशा शब्दात शिवसेनेचा समाचार घेतला आहे.

सोमवारी देखील शिवसेना नेते संजय राऊत यांच्या टीकेचा तरूण भारतच्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला आहे. या अग्रलेखात संजय राऊत यांना बेताल आणि विदूषक असे संबोधत त्यांच्यावर जळजळीत शब्दांत टीका करण्यात आली. ’उद्धव आणि बेताल’, असे शीर्षक असणार्‍या अग्रलेखात संजय राऊत यांच्या नावाचा थेट उल्लेख नाही. मात्र, बेताल या पात्राला उद्देशून वापरण्यात आलेले संदर्भ तंतोतंत संजय राऊत यांना लागू पडत होते.