Breaking News

छावणी परिषदेत भाजपचाच उपाध्यक्ष होणार

भिंगार/प्रतिनिधी 
“पक्ष बळकटीकरणासाठी सर्व बुथनिहाय अध्यक्षांनी भाजप सरकारने सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या सर्व शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांच्या अडी-अडचणी समाजावून घ्याव्यात. सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू मानून विकासात्मक धोरणाने भाजपची वाटचाल चालू आहे. भिंगारमध्ये देखील केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. छावणी परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे सर्वच उमेदवार मताधिक्क्याने निवडून येणार असून, उपाध्यक्ष भाजपचाच होणार आहे’’ असे प्रतिपादन दिलीप गांधी यांनी केले. तसेच बूथ प्रमुखांना जनसंपर्क वाढविण्याचे आवाहन केले.
भिंगार छावणी परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भिंगार भाजप मंडळाच्या वतीने बुथनिहाय कमिटीची बैठक माजी खासदार तथा शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत बुथनिहाय कमिटीवर 17 जणांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक अधिकारी श्रीकांत साठे, सरचिटणीस किशोर बोरा, भिंगार मंडळ अध्यक्ष शिवाजी दहीहंडे, वसंत राठोड, नगरसेविका शुभांगी साठे, लक्ष्मीकांत तिवारी, अनंत रासने, किशोर कटोरे, कैलास गव्हाणे, संतोष हजारे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.