Breaking News

संजय राऊतांना वेड्याच्या रुग्णालयात भरती करा : दानवेंची जहरी टीका

Danave
मुंबई
भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदा आणि त्यांचे स्टेटमेंट भाजपाला चांगलेच टोचल्याचे दानवे यांच्या टीकेवरुन दिसून येत आहे. संजय राऊत यांना वेड लागले असून त्यांना वेड्याच्या इस्पितळात भरती करण्याची गरज असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींवर दानवेंनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाची भूमिका जाहीर केली. अजित पवार यांच्याकडेच अद्यापही व्हीप बजावण्याचा अधिकार आहे. त्यामुळे, भाजपा बहुमत सिद्ध करेल आणि हे सरकार पुढील 5 वर्षांपर्यंत स्थिरपणे कामकाज करेल, असा विश्‍वासही रावासाहेब दानवेंनी व्यक्त केला. अजित पवारांनी भाजपाबरोबर जात सरकार स्थापन केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंही आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवले आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस आणि अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. 20 प्रमुख मंत्रालयं आणि अजित पवारांना अडीच वर्षं मुख्यमंत्र्यांची भाजपाने ऑफर देऊन आपल्याकडे वळवल्याची माहिती सूत्रांकडून मला मिळाली आहे, असे विधान राऊत यांनी केले. त्यानंतर, दानवेंनी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांच्या विधानाचं खंडन करताना, राऊत यांच्यावर जहरी टीका केली. तसेच, त्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करण्याची गरज असल्याचे दानवेंनी म्हटले आहे.
राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाविरुद्ध शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारविरोधात तीन पक्षाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडत आहेत यावरून भाजपाने शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर टीका करताना म्हटले की, ज्या कपिल सिब्बलनी भगवान श्रीराम काल्पनिक आहेत, त्यांचे मंदिर बांधू नये म्हटले होते. त्यांच्यावर संजय राऊतांनी ’सामना’त अग्रलेख लिहिला होता, तेच सिब्बल आता शिवसेनेचे वकील आहेत. संजय राऊत यांनीच तेव्हा त्यांना दारु पिलेला म्हटले होते असा टोला दानवेंनी संजय राऊत यांना लगावला आहे. तसेच संजय राऊत संजय राऊतांनी जास्त बोलू नये, राऊतांना उपचाराची गरज आहे. त्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करावं असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. त्याचसोबत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढील 5 वर्ष राज्याला स्थिर सरकार देतील. ज्या दिवशी राज्यपालांकडे भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला. त्यावेळी अजित पवार राष्ट्रवादीचे गटनेते होते. त्यांच्या 54 आमदारांचे पत्र राज्यपालांना देण्यात आलं आहे. आजही अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यामुळे अजितदादा जो व्हिप देतील तोच व्हिप राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होणार आहे. अजित पवारांना सत्तास्थापनेचा पूर्णपणे अधिकार होता असंही दानवेंनी स्पष्ट केलं आहे.
राज्यातील सत्तास्थापनेबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, बहुमत नसतानाही भाजपाने सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी सभागृहात फ्लोअर टेस्ट देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी विरोधकांनी केली आहे. रविवारी आणि सोमवारी या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात आली असून मंगळवारी सुप्रीम कोर्ट याबाबतची निर्णय देणार आहे. दरम्यान,अजित पवारांबरोबर गेलेले सर्वच लोक परतले आहेत. गुरुग्रामच्या हॉटेलमधल्या ओबेरॉयमधील रुम नंबर 5117मध्ये ऑपरेशन सुरू होतं. शिवसेना-राष्ट्रवादीचे प्रमुख लोक तिथे पोहोचले होते, त्यांनीच त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे. महाराष्ट्रातलं मुख्यमंत्रिपद किंवा सत्ता मिळवण्यासाठी या देशातले राज्यकर्ते कोणत्या थराला जात आहेत. हे चित्र घृणास्पद आहे अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली आहे.