Breaking News

हा तर सेनेविरुद्ध भाजपचा दुर्योधनी कावा: शिवसेना

मुंबई
 सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके. या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळ्यात जास्त गोंधळ आणि भेसळ करत आहेत, अशा शब्दात शिवसेनेनेे  भारतीय जनता पक्षावर टीकेचे प्रहार केले आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्याचा निषेध करत राष्ट्रपती राजवटीची शिफारस म्हणजे महाराष्ट्रात घोडेबाजाराला सुरुवात झाली नसली तरी त्या दिशेने पडलेले ते पाऊल असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.
‘भाजपचा हा दुर्योधनी कावा’
भारतीय जनता पक्षाने राष्ट्रपती राजवटीचे खापर शिवसेनेवर फोडले असले, तरी देखील राष्ट्रपती राजवटीला भारतीय जनता पक्षच जबाबदार असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. ठरल्याप्रमाणे भाजप आपल्या शब्दाला जागला असता तर परिस्थिती इतक्या थराला गेली नसती. शिवसेनेला जे ठरले आहे ते देणार नाही, भले आम्ही विरोधी बाकड्यांवर बसू हा डावपेचाचा भाग नसून शिवसेनेला पाण्यात पाहण्याचा दुर्योधनी कावा असल्याची टीका अग्रलेखात करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊ द्यायची नाही आणि राजभवनाच्या झाडाखाली बसून पत्ते पिसत बसायचे हा सर्व खेळ महाराष्ट्राची जनता पाहत आहे, असा टोलाही लगावण्यात आला आहे.

‘भाजपची विकृती महाराष्ट्राच्या मुळावर आली’

शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला. मात्र पाठिंब्याची पत्रे वेळेत पोहोचू शकली नाहीत. याचा अर्थ 105 वाल्यांनी जल्लोष करावा असा होत नाही, असे सांगताना माझा मळवट मीच पुसला, पण दुसर्‍या सौभाग्याचे वाईट झाले याचा आनंद मानणार्‍यांची ही विकृतीच महाराष्ट्राच्या मुळावर आली असल्याचा आरोप भाजपवर  करण्यात आला आहे.

‘यंत्रणेचा गैरवापर, मनमानी म्हणायची ती यालाच’

भारतीय जनता पक्षासोबतचे कटू अनुभव आम्ही गेली अनेक वर्षे घेत असल्याचे सांगत 24 तारखेपासून सत्तास्थापनेची संधी असतानाही भारतीय जनता पक्षाने हालचाली केल्या नाहीत. भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही त्याला 15 दिवस सहज मिळाले आणि शिवेसनेला मात्र धड 24 तासही मिळाले नाहीत हे कसले कायदे असा प्रश्‍नही  उपस्थित करण्यात आला. म्हणे राज्याबाहेर असलेल्या आमदारांच्या सह्या जमवून आणा, ते देखील 24 तासांत. यंत्रणेचा गैरवापर, मनमानी म्हणायची ती यालाच. कोणतेही दोन किंवा तीन पक्षांचे सूत जमल्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, हे माहीत असतानाही राजभवनातून 24 तासांची मुदत मिळते आणि त्यानंतर 105 वाल्यांकडून जो आनंदी आनंद साजरा केल्याची दृश्ये दाखवली जातात हे काही चांगले लक्षण नसल्याचे सांगत, दिलेल्या शब्दास जागल्याचा आनंद मानावा, की महाराष्ट्र अस्थिरतेच्या खाईत ढकलल्याचा आनंद मानावा हे ज्याचे त्याला ठरवू द्या अशा शब्दांत भाजपला टोला हाणण्यात आला आहे.