Breaking News

बहिरोबावाडीच्या प्रज्वलला दोन लाखांची शिष्यवृत्ती

  
 कर्जत/प्रतिनिधी

 कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडीच्या प्रज्वल राजेंद्र यादव याला पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीकडून दोन लाखांची शिष्यवृत्ती देण्यात आली.प्रज्वल हा बारावीत असताना लव्हली युनिव्हर्सिटीच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेत प्रज्वलने देशात ४३ वा क्रमांक मिळवला होता.त्याबद्दल जालंधर (पंजाब) येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात त्याला दोन लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
 प्रज्वलने बारावीत दिलेल्या किशोर वैज्ञानिक परीक्षेमधून त्याची संशोधक बनण्यासाठी बेंगलोर येथे असलेल्या भारतीय वैज्ञानिक संशोधन संस्थेत त्याची निवड झाली आहे.सध्या प्रज्वल हा आयआयटी खरगपूर (पश्चिम बंगाल) येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.शालेय स्तरापासून प्रज्वलने विविध परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळवलेले आहे.तिसरीच्या प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात प्रथम,सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात सातवा,रयत टॅलेंट सर्चमध्ये राज्यात आठवा, MTS मध्ये राज्यात दहावा क्रमांक तसेच नवोदय विद्यालयात दहावीच्या परीक्षेत ९७.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावत यशाचा आलेख उंचावत ठेवला.
 कविता करणे, कथा लिहिणे, चित्रकला,पेन्सिल स्केच करणे,कलाकुसरीच्या विविध वस्तू बनवणे, तबला वादन हे त्याचे छंद आहेत.श्रीलंका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय तबला वादन स्पर्धेत त्याने दुसरा क्रमांक मिळवला होता.त्याच्या यशाच्या या उत्तुंग भरारीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.