Breaking News

बेकायदा शाळांवर बडगा

वसई
पालघर जिल्ह्यासह वसई-विरार भागात अनधिकृत शाळांची संख्या वाढू लागली आहे. याबाबत शिक्षण विभागाने पालघर जिल्ह्यात असलेल्या अनधिकृत शाळांची यादी मे महिन्यात जाहीर करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वसईतील अनधिकृत शाळांवर कारवाईला वेग आला असून या अनधिकृत शाळांना लगाम घालण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. आतापर्यंत वसई तालुक्यातील 14 अनधिकृत शाळा बंद करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
वसई-विरार भागात अनधिकृत शाळांचे जाळे वेगाने पसरू लागले आहे. त्यामुळे वसईच्या विविध भागांत अनधिकृत शाळा उभारल्या गेल्या आहेत. याबाबत शिक्षण विभागाने पालघर जिल्ह्यातील 190 शाळा अनधिकृत असल्याची यादी जाहीर केली होती. त्यामधील दीडशे अनधिकृत शाळा या वसईच्या भागातील आहेत. त्यातील सर्वाधिक अनधिकृत शाळा या नालासोपारामधील पेल्हार विभागातील आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या अनधिकृत शाळांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विविध स्तरांतून करण्यात येत होती. त्यामुळे या अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. या शाळांना नोटिसा पाठवून त्यांच्यावर रीतसर कारवाई करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. तसेच, या अनधिकृत ठरविण्यात आलेल्या शाळेत कोणत्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, यासाठी पालक व विद्यार्थ्यांना आवाहन करून जनजागृती केली होती. मात्र असे जरी असले तर या अनधिकृत शाळांना लगाम घालण्यासाठी यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली होती.
शिक्षण विभागाने विरार, कळंब, पेल्हार, दहिसर या केंद्रातील 14 अनधिकृत शाळा बंद केल्या आहेत. या वाढत्या कारवाईच्या वेगामुळे अनधिकृत शाळामालकांनी शाळांची परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आतापर्यंत 150 अनधिकृत शाळांपैकी 25 शाळांना शासनमान्यता मिळाली आहे. तर, इतर काही शाळामालकांनी शिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केले असल्याची माहिती वसईचे गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल यांनी दिली आहे.
अपुरे मनुष्यबळ : शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यानुसार विविध भागांतील कानाकोपर्‍यात अनधिकृत शाळांचे जाळे वेगाने पसरू लागले आहे. त्यामुळे शहरात नव्याने तयार होणार्‍या अनधिकृत शाळांचे मोठे आव्हान आहे. या शाळांना रोखण्यासाठी यंदाच्या वर्षी लवकरच सर्वेक्षण सुरू करून शाळांची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे. त्यातच शाळांच्या प्रत्येक कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी मनुष्यबळ अपुरे आहे. वसईत आठ गटशिक्षणअधिकारी पदे रिक्त आहेत. सध्या एकच अधिकार्‍यावर संपूर्ण तालुक्याचा भार आहे. वसईच्या भागात एकूण एक हजार 141 शाळा आहेत. त्यातील 150 शाळा अनधिकृत आहेत.