Breaking News

गुलाल तिकडं चांगभलं...

राज्यात सत्ता स्थापनेवरुन भाजप व शिवसेनेमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा भडका उडाला असून हा वणवा शांत करण्याऐवजी त्यात तेल ओतण्याचे उद्योग काही राजकीय मंडळींकडून सुरु आहे. राजकीय पोळी भाजून घेण्याच्या इराद्याने काहीजण गुपचूपपणे शिवसेनेला भडकाविण्याचे काम करीत आहेत तर काहीजण उघडपणे बिनबुडाचं बेताल वक्तव्य करीत आहेत. सत्तारुपी मधाचं बोट चाटण्याची घाई झालेल्या रामदास आठवले यांच्याकडून तर गुलाल तिकडं चांगभलं.. सुरु आहे. बरं, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या न्यायाने आठवले यांनी भाजपाच्या पोळीवर तूप घेण्याचा प्रयत्न करणे स्वाभाविक आहे. परंतु, हे करीत असताना आपण दुसर्‍याच्या वाट्याचं तूप हिसकावून घेवून तिसर्‍याला देण्याचा अनाठायी उद्योग करतोय, हे ते बहुधा विसरत असावेत. एकीकडे मित्रपक्षातील आठवलेंची  वाचाळगिरी सुरु आहे. रामदास आठवलेंची वाचाळगिरी सुरु आहे किंवा त्यांच्याकडून गुलाल तिकडं चांगलभलं सुरु आहे, हे आम्ही का म्हणतोय हे आम्ही सांगणारच आहे. परंतु, तत्पुर्वी विरोधकांकडून सुरु असलेल्या हालचाली काय सुरु आहेत, हे पाहणं सुध्दा तितकचं महत्वाचं आहे. सत्तेसाठी शिवसेना-भाजपामध्ये साठमारी सुरु असताना विरोधक सुध्दा सावजासाठी जाळं पसरुन दबा धरुन बसलेत. आम्हाला विरोधात बसण्याचा कौल जनतेनं दिला असल्याने आम्ही विरोधात बसू,  भाजप-शिवसेना व मित्रपक्षाला जनाधार मिळाला असल्याने त्यांनी महायुतीचे सरकार स्थापन करावे, असे राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते उघडपणे सांगत असले तरी त्यांचं हे बोलणं दाखविण्यासाठीच असणार यात शंका नाही. याचं कारण एकीकडे शिवसेनेकडून आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आला नाही, असं म्हणताना दुसरीकडे शिवसेनेनं आधी भाजपातून तसेच केंद्रातील एनडीए सरकारमधून बाहेर पडावं, मग आम्ही शिवसेनेला पाठिंबा देवू, अशा प्रकारचा आतल्या अंगाचा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून शिवसेनेला दिला जात आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खावू अशा प्रकारच्या भूमिका आघाडीकडून घेतली जात आहे.
उघडपणे दाखविलं जात नसलं तरी शिवसेनेनं आघाडीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करावं, अशीच इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची असावी. तसं नसतं तर एकीकडे आम्ही विरोधात बसणार असं वारंवार माध्यमांसमोर सांगणारे शरद पवार सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी 10 जनपथपर्यंत तातडीने धाव घेतात, याचा अर्थ काय होतो. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची शेतकर्‍यांना भरपाई देण्यासंदर्भात चर्चा  करण्यासाठी आपण सोनिया गांधी यांना भेटलो असल्याचे शरद पवार सांगतात. भेटीमागचं हे एक कारण असलं तरी दुसरं जे तातडीचं आणि महत्वाचं असलेलं कारण अंधारात ठेवण्याचा पवार प्रयत्न करताना दिसतात. माध्यम प्रतिनिधींनी छेडल्यानंतर मात्र राज्यातील सरकार स्थापनेबाबतची चर्चा सोनिया गांधीशी झाल्याचे अखेर शरद पवार यांना मान्य करावं लागलं. दुसरीकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राउत वारंवार शरद पवार यांची भेट घेत आहेत. सदिच्छा भेट असल्याचे संजय राउत सांगतात. मात्र, चार-दोन दिवसांत पुन्हा पुन्हा सदिच्छा भेट घेण्याइपतचं प्रेम या दोन नेत्यांमध्ये आताच कसं उफाळून आलं आहे, असा प्रश्‍न सहज कुणालाही पडेल. त्याचं कारण सत्ता हेच आहे. थोडक्यात, ताकाला जावून भांडं लपविण्याची भूमिका शरद पवार यांच्याकडून घेतली जात असल्याचं आता अजिबात लपून राहिलं नाही. राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजविला आहे. शेतकर्‍यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकर्‍यांना तातडीने शासकीय मदत मिळणं गरजेचं आहे. तसं झालं तरच आत्महत्या करण्यापासून शेतकर्‍याला रोखता येईल. यासाठी सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांनी बळीराजाविषयी खरीखुरी आस्था दाखवून त्याला सरकारी मदत मिळवून दिली पाहिजे.   एवढेच नव्हे तर सरसकट कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाचा सातबारा पूर्णपणे कोरा करुन त्याला दिलासा दिला पाहिजे. नुकसान भरपाईसंदर्भात राष्ट्रवादी व काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं आहे. ही बाब निश्‍चितच स्वागतार्ह आहे. शरद पवार यांच्याकडूनही नुकसान पाहणी दौरे काढले गेले. सोनिया गांधी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. हे चांगलंच झालं. शेतकर्‍यांना तातडीने मदत करणं महत्वाचं आहे. त्यासाठी पाठपुरावा करणे गैर नाही. परंतु, त्याआड जर कुणी फोडाफोडीचं राजकारण करुन सरकार स्थापनेत अडथळा निर्माण करीत असेल तर ते कधीही योग्य ठरणार नाही. येत्या दोन-तीन दिवसात सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपदी राजवटी येवू शकते. तशा बातम्या आणि चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप-शिवसेनेला जनाधार मिळाल्याने त्यांचं सरकार स्थापन होणं हे न्यायाला धरुन होईल.
महायुतीचं सरकार स्थापन होण्याच्या हालचाली होत असताना त्यात कुणी बिब्बा घालत असेल तर ते मतदारांशी प्रतारणा करणारे ठरेल. शिवसेनेकडून संजय राउत हे एकटेच भूमिका मांडत आहेत तर भाजपामधील सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे हे भूमिका मांडत आहेत. भाजपाच्या या नेत्यांकडून अहंकाराचा सूर पुन्हा पुन्हा आळवला जात असल्याने सोशल मीडियावर त्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करणार्‍या प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे दोन्ही पक्षांमधील तणाव वाढण्यासच मदत होतेय. आमचा कुणीही नेता बोलणार नाही, असं देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत असले तरी भाजपाच्या वाचाळवीरांकडून माध्यमांना उलट-सुलट प्रतिक्रिया देवून तणावात भर घालण्याचा उद्योग सुरु आहे. त्यात मित्रपक्षातील रामदास आठवले यांच्याकडून आगळीक सुरु आहे. शिवसेना 50-50 च्या फार्म्युल्यावर अडून बसली आहे. ठरल्यानुसार अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची वाटणी व्हावी, असं त्याचं ठाम म्हणणं आहे. असे असताना 50-50 चा फार्म्युला म्हणजे पाच वर्षे भाजपाचा मुख्यमंत्री अन् शिवसेनेचा उपमुख्यमंत्री असा अर्थ लावून बालिशपणाचं वक्तव्य आठवले करीत आहेत. आठवलेंच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेचा तिळपापड होणं सहाजिक आहे. एकीकडे तणाव कसा निवळेल यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत असताना आम्ही अल्पमतातील सरकार स्थापन करु, अशी धमकी आठवले देवून शिेवसेनेला डिवचत आहेत. शिवसेनेने आठमुठी भूमिका सोडावी, मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडावा, अशा प्रकारच्या जाहीर प्रतिक्रिया देवून आठवले आगीत तेल ओतत आहेत. जनतेच्या हितासाठी तातडीनं सरकार स्थापन व्हावं, राष्ट्रपती राजवट येवू नये, असं मनापासून  वाटत असेल तर ठरल्याप्रमाणे पदांचं वाटप समसमान करावं, असा सल्ला रामदास आठवले भाजपाला का देत नाहीत. तसा ते देणारही नाहीत. याचं कारण गुलालं तिकडं चांगभलं ही आठवलेंची जुनीच सवय हेच असावं. बरं दोन पक्षात तणाव निर्माण झाला असताना आठवलेंनी मध्यस्थी करण्याची लुडबूड करणं सार्थ ठरावं इतपत त्यांचे आमदार आहेत का, याचाही त्यांनी आधी विचार करणं संयुक्तिक ठरेल.