Breaking News

एसटीची हंगामी दरवाढ मागे

पुणे
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची (एसटी) हंगामी दरवाढ मागे घेण्यात आली आहे. परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या उद्देशाने यंदा करण्यात आलेली हंगामी दरवाढ मागे घेण्यात आली असून, बुधवारी एसटीचे नियमित तिकीट दर आकारण्यात सुरवात केली असल्याचे महामंडळाचे स्पष्ट केले आहे.
यंदा दिवाळीच्या सुट्टीत 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत एसटीच्या साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) व शिवशाही (आसन) बससेवेसाठी मूळ तिकिटावर सरसकट 10 टक्के दरवाढ करण्यात आली होती. या दरवाढीमुळे दररोज सुमारे 2 कोटी रुपये अतिरिक्त महसूल प्राप्त झाला आहे, अशी माहिती महामंडळाने दिली. गर्दीच्या हंगामात महसूल वाढीसाठी करण्यात आलेली ही हंगामी दरवाढ मागे घेण्यात आली आहे. आजपासून एसटीच्या नियमित तिकीट दराची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती महामंडळाने दिली. दरम्यान, या काळात एसटीच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत प्रवाशांनी केलेल्या सहकार्याबद्दल एसटी महामंडळाने आभार मानले आहेत.