Breaking News

संगमनेर तालुक्यातील जमिनी बळकाविण्याचा प्रयत्न अमोल खताळ:गुन्हे दाखल करण्याची मागणी

 संगमनेर/प्रतिनिधी
तालुक्यातील गुंजाळवाडी येथील करोडो रुपयांची जमीन कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून बळकावण्याचा प्रयत्न एका राजकीय नेत्याने केल्याचा आरोप संगमनेरातील सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी केला आहे. गुंजाळवाडी येथील सरकारी फॉरेस्ट जमीन वाटपाने १९६८ साली तुकाराम कचरू कांबळे यांना मिळाली होती. २०१९ पर्यंत सातबारा उताऱ्यावर त्यांचेच नाव होते. सदरची जमीन हि वर्ग दोनची असून शहराच्या लगत असल्याने या जमिनीचा सध्याचा करोडो रुपयांचा बाजारभाव आहे.

महसूलमधील कागदपत्रातील काही त्रुटीचा गैरफायदा घेऊन स्वत:ला प्रतिष्ठित समजणाऱ्या व महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर उठबस असलेला एका राजकीय पदाधिकाऱ्याने महसूलमधील तलाठी, मंडल अधिकारी, लिपिक, तहसीलदार यांना हाताशी धरून मुक्ताबाई निवृत्ती शेंडे या महिलेला कांबळे यांचे खोटे वारस म्हणून तब्बल ५० वर्षांनी उभे केले.

त्यानंतर या पदाधिकाऱ्याने मुक्ताबाई शेंडे यांना संगमनेरच्या तहसिलदारांकडे महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार उताऱ्यावरील नावात बदल करण्यासाठी अर्ज दिला. व उताऱ्यावरील नाव पाहिजे त्याप्रमाणे दुरुस्त करून घेतले, असा आरोप खताळ यांनी केला.

त्यामुळे महसूल व राजकीय पदाधिकारी मिलीभगतीमुळे करोडो रुपयाची सरकारी  जमीन बळकाविण्याचा प्रयत्न संबंधित राजकीय पदाधिकारी व शेंडे यांनी चालविला आहे.

नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी याप्रकरणी दोषी असलेल्या सर्वांचे निलंबन करून फौजदारी गुन्हा दाखल करावा. या प्रकरणामध्ये दोषी असलेल्यांवर कारवाई न झाल्यास वेळप्रसंगी कोर्टात जाऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल, असे देखील खताळ यांनी म्हटले आहे