Breaking News

पवार साहेबांनी माझा राजकीय पुनर्जन्म केला : भुजबळ

Chagan Bhujbal
पुणे
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद देण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे. मात्र कुठले मंत्रीपद असेल  याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. याबाबतची माहिती भुजबळ यांनी पुण्यात दिली. समता पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी ते आले होते. यावेळी बोलताना आपल्या मनोगतात त्यांनी  येवलेकरांचे व त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या मागे उभे राहिलेल्यांचे आभार मानले. तसेच शरद पवार यांनी आपला राजकीय पुनर्जन्म केला असे भावनिक उद्गारही काढले.
यावेळी भुजबळ म्हणाले की, लोकांचे मी आभार मानतो. संकटाच्या काळात अनेकजण माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांचे उपकार मी कधीच विसरु शकणार नाही. मला पुन्हा  एकदा निवडूण दिल्याबद्दल येवल्याच्या जनतेचे मनापासून आभार. मी आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मंत्री म्हणून शपथ घेणार आहे. कुठले मंत्रिपद असेल ते नंतर ठरविण्यात  येणार आहे. मंत्रीपदाची संधी देऊन शरद पवारांनी माझा राजकीय पुनर्जन्म केला आहे. असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले, आम्ही आघाडी करताना जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या, महिलांच्या प्रश्नांवर चर्चा करुन एक समान कार्यक्रम ठरविला. तसेच   संविधानाच्या उद्देशिकेचा आमच्या एकसुत्री कार्यक्रमामध्ये समावेश केला आहे. मंत्रिपदाच्या बाबतीत अद्याप कोणतीही निश्चिती झालेली नाही. तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होऊन   यावर निर्णय होईल. सध्याच्या घडामोडी पाहता सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेणे हे आमचं मुख्य काम आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात व   शरद पवार आणि काँग्रेस श्रेष्ठींच्या मार्गदर्शनाबरोबर सर्व आमदारांच्या सहकार्याने लवकरच विश्वासदर्शक ठराव देखील मंजूर केला जाईल. आगामी दोनचार दिवसांत सर्व गोष्टी स्पष्ट  होतील. उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय शरद पवार हेच घेतील, त्यामुळे मी यावर भाष्य करणार नाही, असे त्यांनी सांगितले. याचबरोबर अजितदादांनी परत यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले  आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन ते परत आल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आगामी काळात शरद पवार त्यांना जी काही जबाबदारी देतील ती ते निश्चितपणे पार पाडतील.  आता तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत.