Breaking News

दिमाखदार सोहळयात उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

दिमाखदार सोहळयात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान

मुंबई
शिवाजी पार्कवर गुरुवारी झालेल्या भव्य दिव्य अशा दिमाखदार कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपालभगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पथविधीसाठी शिवतिर्थावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि कुटुंबियांचा उल्लेख करत त्यांनी शपथ घेतली.  ईश्‍वर साक्ष ठेवून आणि संविधानला स्मरून त्यांनी शपथ घेताच शिवतीर्थावर एकच जल्लोष करण्यात आला.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्राला विधानसभेच्या निकालाच्या 36 दिवसानंतर मुख्यमंत्री लाभला आहे. उद्धव ठाकरे शपथविधीनंतर जनतेसमोर नतमस्तक झाले. उद्धव यांच्यानंतर शिवसेनेकडून शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबख यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर काँगे्रसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी शिवतीर्थावर तुफान गर्दी लोटली होती. ’कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, ’जय भवानी, जय शिवाजी’, ’आवाज कुणाचा, शिवसेनेचा’ असा जयघोष करत हजारो शिवसैनिक कुटुंबकबिल्यासह शिवतीर्थावर धडकले आहेत. त्यामुळे संपूर्ण दादर परिसर गर्दीने फुलून गेला होता. या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यासाठी शिवतीर्थावर खास स्टेज तयार करण्यात आला होते.  सुप्रसिद्ध कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्यासपीठ साकारण्यात आले होते. तसेच संपूर्ण व्यासपीठाला किल्ल्याचं स्वरूप देण्यात आले होते. शिवाजी पार्क परिसरात सुमारे 70 हजार आसनांच्या व्यवस्थासह व्यासपीठावर 300 मान्यवरांच्या बसण्याची सोय करण्यात आली होती.  संपूर्ण मैदानात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह मित्रपक्षांचे झेंडे लावण्यात आल्याने संपूर्ण मैदान झेंड्यांनी फुलून गेले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता स्थानिक पोलिसांबरोबरच, सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी), बॉम्बशोधक आणि नाशक पथक, मुंबई वाहतूक विभाग आणि जवळपास 2 हजार अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असा तैनात करण्यात आले होते.