Breaking News

स्वामी नित्यानंदचा देश सोडून पोबारा

गुजरात पोलिसांचा दावा

अहमदाबाद 
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू स्वामी नित्यानंद देश सोडून पळाला असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी गुरुवारी दिली. नित्यानंदविरोधात अपहरण आणि मुलांचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी नित्यानंदच्या दोन अनुयायांना अटक केली आहे. पुराव्यांची जमावजमव सुरू असतानाच नित्यानंद फरार झाला आहे.
अहमदाबाद (ग्रामीण) पोलिस अधीक्षक एस व्ही असारी यांनी सांगितले की, नित्यानंद विरोधात कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो देश सोडून पळाला आहे. गुजरात पोलिसांकडून त्याच्या अटकेसाठी प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांनी त्याच्या दोन महिला अनुयायांना अटक केली आहे. या दोघींवर चार मुलांचे अपहरण करुन त्यांना एका खोलीमध्ये बंद करुन ठेवल्याचा आरोप आहे. नित्यानंदच्या आश्रमामधून बेपत्ता झालेल्या महिलेचा देखील पोलिसांकडून शोध सुरु आहे. महिलेच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बुधवारी नित्यानंदविरोधात गुन्हा दाखल केला. त्याच्यावर अहमदाबाद येथील अपना आश्रमामध्ये योगिनी सर्वज्ञपीठम चालवण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करुन त्यांना भीक मागण्यास सांगितल्याचा आरोप आहे.