Breaking News

गुरू नानक यांची शिकवण प्रेरणा देणारी : पंतप्रधान मोदी

कर्तारपूर कॉरिडॉरच्या तपास नाक्याचे उद्घाटन

गुरुदासपूर 
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांची शिकवण केवळ शीख समुदायालाच नाही तर सर्व भारतीयांना प्रेरणा देणारी असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केले. कर्तारपूर कॉरिडॉरच्या तपास नाक्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल व्ही.पी. सिंग बदनौर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल, माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते आणि खासदार सुखबीर सिंह बादल, माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह, गुरुदासपूरचे खासदार सनी देओल प्रामुख्याने उपस्थित होते.
एकात्मिक तपासनाक्याच्या उद्घाटनामुळे पाकिस्तानातल्या कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणार्‍या भारतीय यात्रेकरुंची सोय होणार आहे. गुरुनानक देवजी यांची 550 वी जयंती देशभरात आणि जगभरात भव्य आणि दिमाखदार पद्धतीने साजरी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 22 नोव्हेंबर 2018 रोजी एक प्रस्ताव मंजूर केला होता. डेरा बाबा नानक येथे आंतरराष्ट्रीय सीमेलगत झिरो पॉइंट येथे कर्तारपूर साहिब कॉरिडॉरच्या परिचालनासाठी भारताने पाकिस्तानबरोबर 24 ऑक्टोबर रोजी एका करारावर स्वाक्षर्‍या केल्या. पाकिस्तानबरोबर 24 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या करारामध्ये कर्तारपूर साहिब कॉरिडॉरच्या परिचलनासाठी अधिकृत रुपरेषा आखण्यात आली आहे. भारतातल्या यात्रेकरुंना वर्षभरात कधीही कर्तारपूर गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देता यावी यासाठी डेरा बाबा नानक पासून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत कर्तारपूर साहिब कॉरिडॉरच्या बांधकामाला आणि विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हा कॉरिडॉर काही अधिसूचित दिवस वगळता वर्षभर सुरु राहील, याबाबत पूर्व सूचना दिली जाईल. यात्रेकरुंना वैयक्तिकरित्या किंवा गटाने प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध आहे तसेच पायी प्रवास देखील करता येईल. वेगवेगळ्या देशांनी जारी केलेली गुरुनानक यांची नाणी, शीख समुदायसाठी महत्वाची धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी आठवड्यातून एकदा चालवली जाणारी विशेष ट्रेन, नागपूर ते अमृतसर विमानसेवा अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला. याच भाषणात त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राहणार्‍या शीख समुदायातील लोकांना कलम 370 रद्द झाल्याने दिलासा मिळणार असल्याचेही म्हटले. 370 हटल्याने जम्मू काश्मीर आणि लडाखमध्येही शीख परिवारांनाही इतर भारतीयांप्रमाणे अधिकार मिळणार आहेत. तिथे राहणार्‍या हजारो शीख नागरिकांना कलम 370 संदर्भातील निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.


पाकिस्तान आणि इम्रान खान यांचे मानले आभार
कर्तारपूर प्रकल्पासंदर्भात वेगाने काम करणार्‍या पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानचे इम्रान खान यांचे अभार मानले. मी पाकिस्तान सरकारचे तसेच पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार मानतो. भारतीयांच्या भावना समजून त्यांनी या प्रकल्पाचे त्वरित काम केले. इतकचं नाही मी या प्रकल्पामध्ये काम करणार्‍या सर्व कामगारांचेही अभिनंदन करु इच्छितो, असं म्हणत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. तसेच या चेक पोस्टच्या माध्यमातून हजारो श्रद्धाळूंची सेवा केली जाईल असा विश्‍वासही व्यक्त केला.