Breaking News

वाहनचालकांना लुटणारे गजाआड

अहमदनगर/प्रतिनिधी 
रात्रीच्या वेळी महामार्गावरील वाहनचालकांना मारहाण करून लुटणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजांआड केले. भाऊसाहेब उत्तम महारनवर, अनिल नामदेव माने अशी पकडलेल्या आरोपींची नावे असून, ते कर्जत तालुक्यातील आहेत. नगर-सोलापूर महामार्गावर पाटेवाडी शिवारात मालट्रक थांबवून चालक सद्दाम सलीम शेख यांना मारहाण करून त्यांच्य़ाकडील रोख रक्कम, मोबाइल, एटीएम कार्ड चोरट्यांनी चोरून नेले होते. मंगळवारी रात्री ही घटना घडली होती. शेख यांच्या फिर्यादीवरून दोन चोरट्यांविरुद्ध कर्जत पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता. कर्जतमधील पाटेगाव येथील भाऊसाहेब महारनवर व माही जळगाव येथील अनिल माने या दोघांनी मिळून हा गुन्हा केला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघा आरोपींना अटक केली.