Breaking News

जुहूमधून अडीच लाखांचे चरस जप्त

मुंबई
विलेपार्ले येथील पुष्पा पार्क परिसरात चरस विक्री करणार्‍या एकाला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. हर्षद पुरळेकर (39) असे आरोपीचे नाव असून  तो जुहू चर्च रोड येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून सुमारे 600 ग्रॅम मनाली चरस पोलिसांनी जप्त केला आहे.
हर्षद हा मनाली येथून चरस घेऊन येत असे. त्याची विक्री मुंबईमधील ग्राहकांना करत असे. त्यासाठी तो त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत असे. तसेच रस्त्यावर त्या ग्राहकांना चरसची खेप पोहच करत असे. शहरातील अनेक ग्राहक त्याच्या संपर्कात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हर्षद हा ग्राहकाला नुकत्याच मनालीवरून आणलेल्या चरसची विक्री करण्यासाठी विलेपार्ले परिसरात येणार आहे, अशी माहिती जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांना खबर्‍यांकडून मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक भारत सलगर आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक हरीभाऊ बिरादार यांच्या पथकाने सापळा रचून हर्षद याला अटक केली. त्याच्याकडून दोन लाख 40 हजार किमतीचा सुमारे 600 ग्रॅम चरस पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.